सिंधुदुर्ग - पालकमंत्री उदय सामंत हे जिल्हा नियोजनाबाबत आमदार आणि इतर लोकप्रतिनिधींनी सुचवलेली कामे थांबवतात. नियमबाह्य पद्धतीने या कामांचे स्वरूप बदलले जाते. शासनाने जनतेसाठी दिलेले पैसे अद्याप जिल्ह्यात पोहचलेच नाहीत, असे म्हणत भाजपा खासदार नेते नारायण राणे यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्यावर टीका केली.
जिल्ह्यातील रखडलेली विकास कामे आणि परतीच्या पावसामुळे झालेले भातशेतीचे नुकसान याबाबच चर्चा करण्यासाठी राणे यांनी आज जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांची भेट घेतली. जिल्ह्यातील विकासकामे तत्काळ सुरू करावीत, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत करावी, अशी मागणी राणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. 'चिरे खाण' व्यावसायिकांना दिलेले अल्पमुदतीचे परवाने रद्द करू नयेत, अशीही मागणी त्यांनी केली.
नारायण राणे यांनी यावेळी पालकमंत्री उदय सामंत यांच्यावर जोरदार टीका केली. पालकमंत्री हे जिल्हा नियोजन विभागाच्या बैठकीत आमदार आणि अधिकाऱ्यांनी सुचवलेली कामे परस्पर बदलत असल्याचे राणे म्हणाले. पालकमंत्र्यांची ही कृती नियमबाह्य आहे. हे थांबवा, अशी विनंतीही आपण जिल्हाधिकाऱ्यांना केल्याचे राणेंनी सांगितले.