सिंधुदुर्ग - जिल्ह्यात नारळी पौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. मालवण, देवगड आणि वेंगुर्ला किनारपट्टीतील कोळी बांधवांनी समुद्र किनाऱ्यावर एकत्र येत आजचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला. पारंपारिक पद्धतीने ढोलताशाच्या गजरात मानाचा नारळ कोळी बांधव आजच्या दिवशी समुद्राला अर्पण करतात. यासाठी सिंधुदुर्गातील कोळी बांधवांनी मालवण, देवगड आणि वेंगुर्ला समुद्रकिनारी मोठी गर्दी केली होती. नारळ अर्पण केल्यानंतर समुद्राला प्रार्थना करण्यात आली.
आजपासून तुझ्या यम लहरी शांत कर, आमच्या व्यवसायला वृद्धी दे, व्यवसायात यश दे अशी मागणी नारळी पौर्णिमेनिमित्त समुद्र देवतेकडे करण्यात आली. यावेळी मालवणमध्ये महिलांसाठी नारळ लढवण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. मालवणी संकृती आणि वारसा मंडळ यांनी या स्पर्धेचे आयोजन केले. यावेळी महिलावर्गाने पारंपारिक वेशभूषेत मोठ्या संख्येने नारळ लढवण्याच्या स्पर्धेत सहभाग घेतला. समुद्राला नारळ अर्पण करण्यासाठी कोळी बांधवांप्रमाणेच इतर नागरिकांनीही समुद्र किनाऱ्यांवर मोठी गर्दी केली.
खराब हवामान, यांत्रिक मासेमारी आणि मत्स्यदुष्काळ यामुळे गत हंगामात पारंपरिक मच्छिमारांची निराशा झाली होती. त्यामुळे मत्स्य प्रजनन काळातील बंदी संपल्यानंतर नवीन हंगामात तरी पुरेशी मासळी मिळावी, अशी अपेक्षा पारंपरिक मच्छिमारांना आहे.