सिंधुदुर्ग - सावंतवाडी शहरामध्ये उभा बाजार येथे दोन वृद्ध महिलांचा खून करण्यात आला या बातमीनंतर जिल्ह्यात सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. या वृत्तानंतर सावंतवाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. हे खून कोणी व का केले हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही.
दोन्ही वृद्ध महिलांचे खून
सावंतवाडी शहरातील उभाबाजार परिसरात दोन वृद्ध महिलांचा खून करण्यात आला आहे. धारदार वस्तूने हा खून झाला आहे. नेमका कसा प्रकार झाला, हे अद्याप कळू शकले नाही. दरम्यान, पोलीस तपास सुरू आहे. याबाबतची माहिती सहायक पोलीस निरीक्षक तौसिफ सय्यद यांनी दिली. निलिमा नारायण खानविलकर (वय ८०) व शालिनी शांताराम सावंत (वय ७५) असे मृत दोघा व्यक्तींची नावे आहेत. यातील शालिनी या खानविलकर यांच्याकडे केअरटेकर म्हणून काम करत होत्या.
रक्ताच्या थारोळ्यात होते मृतदेह
याबाबतची अधिक माहिती माजी नगरसेवक राजू मसुरकर यांनी दिली. ते म्हणाले, या ठिकाणी असलेल्या खानविलकर या माझ्या जवळच्या नातेवाईक आहेत. मी त्यांची विचारपूस करण्यासाठी व आज सकाळी नेहमीप्रमाणे त्यांना घरी टीव्ही लावून देण्यासाठी आलो असता हाक मारल्यानंतर त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे मी थेट घरात गेलो, त्यावेळी त्या दोघी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसल्या. हा सर्व प्रकार पाहून मी याबाबतची माहिती सावंतवाडी पोलीस ठाण्याला फोन करून दिली. हा प्रकार अज्ञात चोरट्याकडून झाला असावा, त्यांच्या गळ्यात सोन्याच्या चैन होत्या. त्यामुळे सोन्यासाठी त्यांचा खून झाला असावा असा संशय आहे, असे मसुरकर म्हणाले.
दोघांवरही धारदार शस्त्राने वार
याबाबतची खबर त्यांच्या भाच्याला दिल्यानंतर तो या ठिकाणी यायला निघाला आहे. यावर सहायक पोलीस निरीक्षक तौसिफ सय्यद यांना विचारले असता दोघांवर धारदार शस्त्राने वार केले आहेत. दोघे रक्तबंबाळ अवस्थेत घटनास्थळी पडून आहेत. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्यामुळे त्यांचे निधन झाले. मात्र नेमका खून का झाला याबाबत तपास करण्यात येणार आहे. तर अधिक तपासासाठी फोरेन्सिक एक्सपर्ट बोलविण्यात आले आहेत.