सिंधुदुर्ग - जिल्ह्यातील दोडामार्ग-मणेरी येथे विजेच्या धक्क्याने आई आणि मुलाचा मृत्यू झाला आहे. तर, त्यांना वाचवविण्यासाठी गेलेले अन्य दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. गुरूदास नाईक आणि शोभा नाईक अशी मृतांची नावे आहेत. महावितरणच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत.
![shock](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-1-sidg-14-aug-2019-electricshockdeath-v1_14082019184045_1408f_1565788245_326.jpg)
नाईक कुटुंबाच्या घराजवळ विद्युत तार तुटून पडली होती. काही दिवसांपूर्वी या तारेला स्पर्श होवून एक कुत्रा मेला होता. कुत्र्याची दुर्गंधी येत असल्याने तो बाजूला करण्यासाठी शोभा विद्युत तारेजवळ गेल्या होत्या. तेव्हा, त्यांनाही विजेचा धक्का बसल्याने त्या खाली कोसळल्या. त्यांना सोडविण्यासाठी त्यांचा मुलगा गुरूनाथ हा धावला असता, त्यालाही विजेचा जोरदार झटका बसून तो देखील जागीच मरण पावला. हा प्रकार पाहिल्यानंतर त्यांना वाचवण्यासाठी अनिल आणि रामदास हे दोघे गेले होते. त्यांनी बांबूच्या सहाय्याने त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु, बांबू ओला असल्यामुळे त्यांना देखील विजेचा धक्का बसून ते गंभीर जखमी झाले.
या घटनेसाठी महावितरणचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. दरम्यान, संबंधीत अधिकार्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मणेरी येथील ग्रामस्थ करत आहेत.