सिंधुदुर्ग - कोरोना संसर्ग रोखण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढणे गरजेचे आहे. त्यासाठी सिधुदुर्गातील प्रत्येक व्यक्तीला आमदार नितेश राणे अर्सेनिकम अल्बम 30 आणि कॅम्फर 1 एम या होमिओपॅथी गोळ्या देणार आहेत. भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने या गोळ्या उपयुक्त असल्याचे प्रमाणित केले आहे.
विशेष म्हणजे इराण आणि इतर देशांमध्ये या गोळ्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर वाटल्या गेल्या आहेत. त्यामुळे कोरोना विरुद्धच्या लढ्यात या होमिओपॅथी गोळ्यांना फार महत्व आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी माणसाच्या शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढली पाहिजे. त्यासाठी भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने होमिओपॅथी अर्सेनिकम अल्बम 30 आणि कॅम्फर 1 M या दोन प्रकारच्या गोळ्यांचे रोगप्रतिकारक शक्ती वाढविणाऱ्या गोळ्या म्हणून जाहीर केल्या आहेत. या गोळ्या प्रत्येक व्यक्तीला आपण घरपोच वाटणार आहोत असे आमदार नितेश राणे यांनी कळविले आहे.
एक गोळी तीन दिवस अशी प्रतिमहिना घेणे गरजेचे आहे. असे तीन महिने घेतल्यास रोगप्रतिकार शक्ती वाढते. त्यामुळे आम्ही प्रत्येकाला या गोळ्या उपलब्ध करून देणार. पहिल्या टप्प्यात 10 लाख गोळ्या सिंधुदुर्गमध्ये वाटप करणार असल्याचे आमदार नितेश राणे म्हणाले. कोरोनाविरुद्धच्या लढ्यात या गोळ्या निश्चितच यश मिळवून देतील असा विश्वास आमदार राणे यांनी व्यक्त केला आहे.