सिंधुदुर्ग - आमदार नितेश राणे यांनी अधिकाऱ्यांशी पुन्हा एकदा दादागिरीचा केल्याचा प्रकार समोर आला आहे. कणकवलीमध्ये चिखलमय झालेल्या रस्त्याचा जाब विचारताना नितेश यांनी महामार्ग उपअभियंता प्रकाश शेडेकर यांना अरेरावी करत दमदाटी आणि शिवीगाळ केली. तसेच धक्काबुक्की करत अधिकाऱ्याला चक्क चिखलाच्या पाण्याने आंघोळ देखील घातली. त्यामुळे एखाद्या आमदाराला अधिकाऱ्याशी, असे वर्तन करण्याचा अधिकार कोणी दिला? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
काही महिन्यांपूर्वी मत्स्य उपायुक्तांशी केलेल्या गैर वर्तनामुळे आणि दादागिरीमुळे नितेश राणे वादात सापडले होते. या प्रकरणात त्यांच्या विरोधात गुन्हा देखील दाखल झाला होता. त्यानंतरही नितेश राणे यांची दादागिरी सुरूच असल्याचे दिसत आहे. आज चिखलमय रस्त्याचा जाब विचारताना पुन्हा एकदा नितेश राणेंची जीभ घसरली. त्यांनी महामार्ग उपअभियंता प्रकाश शेडेकर यांच्याशी अरेरावी करत शिवराळ भाषा वापरली. इतकेच नव्हे तर नितेश आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्याला धक्काबुक्की करत चिखलाने अंघोळ देखील घातली. एवढ्यावरच न थांबता शेडेकर यांना राणेंच्या कार्यकर्त्यांनी बांधून देखील ठेवले होते.
दरम्यान, या घटनेमध्ये उपअभियंता शेडेकर यांच्या डोळ्याला चिखलामुळे किरकोळ दुखापत झाली आहे. तर नितेश राणे यांनी आजच्या प्रकारावर प्रतिक्रिया देताना आपल्या कृत्याचे समर्थनच केले.