सिंधुदुर्ग - निकृष्ट काम करून हायवे ठेकेदाराने संपूर्ण कणकवलीची वाट लावली आहे. हायवे ठेकेदार लोकांच्या जीवाशी खेळत आहे. पहिल्याच पावसात उड्डाण पुलाच्या जोड रस्त्याची भिंत कोसळली. ही भिंत वाहनावर, नागरिकांवर कोसळली असती, तर अनेकांना नाहक जीव गमवावा लागला असता असा आरोप आमदार नितेश राणे यांनी आज हायवे ठेकेदाराच्या कामाबाबत तीव्र संताप व्यक्त केला.
आमदार नितेश राणे यांनी दोषी अधिकारी आणि हायवे ठेकेदारावर कारवाई व्हायला हवी, अशी मागणी देखील केली आहे. शहरातील उड्डाणपूल जोड रस्त्याची संरक्षक भिंत कोसळल्यानंतर आमदार नितेश राणेंसह नगराध्यक्ष समीर नलावडे, प्रांताधिकारी वैशाली राजमाने, शिवसेना नेते संदेश पारकर आदींनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. यावेळी आमदार नितेश राणे यांनी हायवे ठेकेदाराच्या कामाबाबत तीव्र नापसंती व्यक्त केली. गेल्यावर्षी आम्ही हायवेच्या कामाबाबत आंदोलन केले, तेव्हा आमच्यावर गुन्हे दाखल करून आवाज बंद करण्याचा प्रयत्न केला. पण हायवे ठेकेदार हा लोकांच्या जीवाशी खेळत आहे, त्यामुळे आम्ही जनतेसाठी पुन्हा-पुन्हा आंदोलन करतच राहणार असल्याचा इशारा आमदार राणे यांनी दिला.