सिंधुदुर्ग - राज्यातील कोणत्याच विषयावर चर्चा व निर्णय घेण्यापासून हे ठाकरे सरकार पळत असून दोन दिवस अधिवेशन ठेवून श्राद्ध उरकावे तसे अधिवेशन उरकणार आहे, अशी टिका आमदार आशिष शेलार यांनी केली आहे. हे सरकार अधिवेशनापासून पलायनवादी सरकार असल्याचा आरोप करत, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेचा कारभार हा चिंताजनक व संतापजनक असल्याचाही आरोप त्यांनी केला.
मदत देण्यापेक्षा शिवसेनेचे आमदार करताहेत राजकारण
सिंधुदुर्ग दौऱ्यावर आलेले आमदार आशिष शेलार माध्यमांशी बोलताना म्हणाले कि, "जिल्ह्यातील काही ग्रामपंचायती, कोरोना केअर सेंटरची प्रत्यक्ष पाहणी केली, आरोग्य यंत्रणेची माहीती घेतल्यानंतर आरोग्य यंत्रणेचे चित्र हे निराशाजनक, चिंताजनक व काही ठिकाणी संतापजनक आढळले आहे". आरोग्य यंत्रणेतील तज्ञ डॉक्टरांची पदे काही काळापुरतीच भरण्यात आलेली आहेत. आरोग्य यंत्रणा अतिशय ढिसाळ पद्धतीची आहे. येथील पालकमंत्री धीर द्यायला जिल्ह्यात दिसत नाहीत. मदत देण्यापेक्षा शिवसेनेचे आमदार राजकारण करताहेत, असेही ते म्हणाले.
सरकारची अवस्था 'रात्रीस खेळ चाले मधील पांडूसारखी'
जिल्ह्यात आलेल्या निसर्ग वादळाची, तौक्ते वादळाची जलद पाहणी करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी 252 कोटी नुकसान झाल्याचे घोषीत केले. मात्र या दोन्हीही वादळाची तसेच धान खरेदी बोनस, अवकाळी पावसाची अशा विविध नुकसान भरपाई देण्यास हे सरकार वारंवार विसरत आहे. त्यामुळे सरकारची अवस्था रात्रीस खेळ चाले मधील पांडूसारखी झाली आहे. झोपलेल्या या सरकारला जागे करण्यासाठी आंदोलन करायचे तर कोरोनाच्या परिस्थितीमध्ये ते योग्य नाही. याबाबत अधिवेशनात प्रश्न मांडावे तर हे सरकार कोरोनाचा वापर करून केवळ दोन दिवस अधिवेशन ठेवून श्राद्ध उरकण्यासारखे करू पाहताहेत. त्यामुळे कोणत्याही विषयावर चर्चा, निर्णय होणार नाही. असेही ते म्हणाले.
पदोन्नती आरक्षणासाठी आक्रमक होणारी काँग्रेस सत्तेत मदमस्त झाली
मराठा समाजाला विशेष आरक्षण मिळावे यासाठी विशेष अधिवेशन बोलाविणार असे सांगणारे हे सरकार ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण टिकवू शकले नाही. पदोन्नती आरक्षणासाठी आक्रमक होणारी काँग्रेस सत्तेत मदमस्त झाली आहे. असे असताना, शिवसेना काँग्रेस मनोवृत्तीला मांडी लावून का अजूनही बसली आहे व शिवसेना काँग्रेस मनोवृत्तीला मांडी लावून का अजूनही बसली आहे. राष्ट्रवादी व काँग्रेस सोबत जाणारी शिवसेना ही शिवशाही शब्दाला विसरली असून आता बेबंदशाही सुरू आहे, असाही टोला त्यांनी लगावला.
हेही वाचा - प्रत्येक जिल्ह्यातून डेल्टा प्लसचे नमुने गोळा केले जाणार - राजेश टोपे