सिंधुदुर्ग - मालवण शहरालगत असलेल्या किनारपट्टी गावातील एका अल्पवयीन शाळकरी मुलीवर शारीरिक अत्याचार करून त्याचे व्हिडीओ चित्रीकरण केल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. ऐन दिवाळी दिवशी उघडकीस आलेल्या या घटनेने सिंधुदुर्ग जिल्हा सुन्न झाला आहे. या प्रकरणी मुलीच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीवरुन मालवण पोलीस ठाण्यात तीन युवकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी तात्काळ कारवाई करत सायंकाळी उशिरापर्यंत तीनही संशयितांना ताब्यात घेतले. त्यानंतर रात्री उशीरा त्यांच्यावर पॉक्सो आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक तुषार पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन कटेकर हे मालवणात दाखल झाले होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा दाखल करण्यात आला.
फेसबुकवरुन झाली ओळख..
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फेसबुकवरून ओळख झाल्यानंतर भूषण शरद माडये (वय २२, रा. तारकर्ली-मालवण) याच्यासोबत पीडितेचे व्हाट्सअपच्या माध्यमातून बोलणे सुरू होते. त्यानंतर १२ नोव्हेंबर रोजी मुलीचे आईवडील काही कामानिमित्त बाहेरगावी गेले असता, पीडिता भूषण सोबत काही अंतरावर असलेल्या किनारपट्टी गावात फिरायला गेले.
दोघांनी केले अत्याचार..
हे दोघे एका लॉजवर गेल्यानंतर त्याठिकाणी प्रथमेश ढोलये (वय २४, रा. धुरीवाडा, मालवण) आणि केशव ध्रुवबाळ फोंडबा (वय २४, रा. सर्जेकोट मालवण) हे दोघे आले. त्यानंतर भूषण आणि प्रथमेश यांनी पीडितेवर अत्याचार केले, तर केशवने तिचा विनयभंग केला. यासोबतच, या सर्व प्रकाराचे व्हिडिओ चित्रण करत पीडितेला ते व्हायरल करण्याची धमकीही देण्यात आली.
अवघ्या काही तासांत संशयित ताब्यात..
अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये दोघा संशयित युवकांना पोलिस निरीक्षक एस. एस. ओटवणेकर व पोलीस उपनिरीक्षक सचिन चव्हाण यांनी ताब्यात घेतले. तर प्रथमेश ढोलये हा कुडाळ येथे जात असताना सचिन चव्हाण, धोंडू जानकर व सिद्धेश चिपकर या पथकाने त्याला ताब्यात घेतले.
'त्या' लॉजची सखोल चौकशी गरजेची..
ज्याठिकाणी पीडितेवर अत्याचार झाले त्या लॉजची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. चौकशी केल्यास या लॉजमध्ये सुरू असणारे सर्व अनैतिक प्रकार समोर येतील. अन्य काही युवतींच्या बाबतीत असे प्रकार घडले असण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे त्यादृष्टीने चौकशी व्हावी अशी मागणी मुलीच्या पालकांनी केली आहे.
हेही वाचा : बलात्काऱ्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यानं मुलीला लावलं पणाला