सिंधुदुर्ग - पदाधिकाऱ्यांनी विकास कामांबाबत अभ्यास करायला हवा. त्यासाठी वेळ मिळेल तेव्हा विविध विषयांवरील वाचन केले पाहिजे. पंचायत समिती कार्यालयात चांगले वाचनालय हवे. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख(Vilasrao Deshmukh) यांनी सभापती ते मुख्यमंत्री अशी वाटचाल केली. तशी तुमची वाटचाल असावी, असा सल्ला केंद्रीय मंत्री नारायण राणे(Union Minister Narayan Rane) यांनी पदाधिकाऱ्यांना दिला. कणकवली पंचायत समिती नूतन इमारत लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते.
- ज्या पक्षाने आपल्याला पदे दिली त्या पक्षाची जाणीव ठेवली पाहिजे -
ज्या पक्षाने आपल्याला पदे दिली, त्या पक्षाची जाणीव ठेवली पाहिजे. भाजपची सत्ता असलेली ही पंचायत समिती आहे. त्यामुळे लोकांचे आशीर्वाद मिळवून काम करा. मी साहेब नाही, जनतेचा सेवक आहे. त्यामुळे कधीही हाक द्या. मी जनसेवेसाठी हजर असेल, असेही राणे म्हणाले. कणकवली पंचायत समितीच्या नूतन इमारतीच्या आतील कारभार सुबक झाला पाहिजे, तेव्हाच इमारत सुंदर दिसेल. नागरिकांचे प्रश्न मार्गी लागावेत, त्यासाठी ही इमारत आहे. यशवंतराव चव्हाण यांनी सत्तेचे विकेंद्रीकरण केले. त्यामुळेच पदाधिकाऱ्यांनीही त्या पद्धतीने काम करावे. कणकवलीत कुठलेही मतभेद नाहीत. ही चांगली बाब असून या नूतन इमारतीतून लोकाभिमुख कामे करा, असा सल्ला मंत्री राणे यांनी पदाधिकाऱ्यांना दिला.
- जनतेचा सेवक समजून काम करा-
विकासाचा अभ्यास करावा, वेळ मिळेल तेव्हा वाचायला बसले पाहिजे. पंचायत समितीचे सदस्य व पदाधिकारी अभ्यासू असतील तर काम चांगले होईल. विलासराव देशमुख यांची सभापती ते मुख्यमंत्री कशी वाटचाल वाटते? तशीच तुमची वाटचाल असावी. पक्षाची जाणीव ठेवली पाहिजे, भाजपची सत्ता असलेली ही पंचायत समिती आहे. लोकांचे आशीर्वाद मिळवून काम करा. विकासाची संधी मिळाल्यास मी जनतेचा सेवक समजून काम करत रहा, असेही राणे यांनी सांगितले.
यावेळी माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे, जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत, पंचायत समिती सभापती मनोज रावराणे, अंकुश जाधव, संजय देसाई, श्रीया सावंत, भाजप जिल्हाध्यक्ष व माजी आमदार राजन तेली, भाग्यलक्ष्मी साटम, उपसभापती प्रकाश पारकर, मिलींद मेस्त्री, तुळशीदास रावराणे आदींसह पंचायत समिती सदस्य व तालुक्यातील सरपंच, उपसरंपच, पदाधिकारी उपस्थित होते.