सिंधुदुर्ग - मालवणीमुळे बोलबाला निर्माण करणाऱ्या सावंतवाडी तालुक्यातील इन्सुली गावचे सुपुत्र म्हमजेच प्रसिद्ध अभिनेते दिगंबर नाईक यांच्या नावाने पोस्टाचे तिकिट प्रकाशित करण्यात आले आहे. जागतिक टपाल दिनानिमीत्त भारतीय डाक विभागाकडून सुरू असलेल्या राष्ट्रीय डाक सप्ताहात नाईक यांच्या पोस्ट तिकिटचे अनावरण करण्यात आले. यावेळी कणकवलतील वारगांव येथील विजय केसरकर यांचा फोटो असलेली पोस्टाची तिकिटे काढून त्यांचाही विशेष सत्कार झाला.
अशाप्रकारे देशभरातील विविध क्षेत्रातील व्यक्तींना सन्मान प्राप्त झाला होता. मात्र मालवणी सुपुत्राचा असा प्रथमच गौरव करण्यात येत आहे. सिंधुदुर्गच्या मातीतील दिगंबर नाईक यांनी आपल्या अभिनयाने कलाक्षेत्रात, चित्रपट-नाट्यक्षेत्रात एक वेगळाच मानदंड प्रस्थापित केला आहे. राजकीय क्षेत्रात आपल्या अमोघ वक्तृत्वाने सगळ्यांची मने जिंकणारे, सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल प्रसिद्ध असणारे दिगंबर नाईक यांच्या फोटोसह असेलल्या टपाल तिकिटाचे प्रकाशन सिंधुदुर्गसाठी अभिमनाची बाब आहे. मुंबई येथील जनरल पोस्ट ऑफिस,दादर येथे हा कार्यक्रम पार पडला.
दिगंबर नाईक यांचा फोटो असलेली 500 रुपयांची तिकिटे विक्रीसाठी आली आहेत. मुंबई येथे झालेल्या या कार्यक्रमाला पोस्टचे वरिष्ठ अधिकारी बी. एस. पठारे, एस. एल. परब, बाळा चौकेकर, सुरेंद्र पालव आदी उपस्थित होते. शालेय जीवनापासूनच अभिनयची आवड असणाऱ्या दिगंबर नाईक यांनी अभिनयासाठी मुंबई गाठली.
विशेष म्हणजे अभिनय करताना त्यांनी मालवणी बाज कायम ठेवला. संधी मिळेल तिथे मालवणी भाषा आवर्जून बोलण्याचा त्यांचा शिरस्ता आहे. "विच्छा माझी पूरी करा", "भटाच्या साक्षीने", "अर्धी मस्ती अर्धा ढॉंग", "मिस्तर नामदेव म्हणे", "लाडीगोडी' यासारखी अनेक नाटके तर "गाव गाता गजाली', "फू बाई फू", "बिग बॉस" यासारखे अनेक रिअॅलिटी शो आणि अनेक चित्रपटांतून त्यांचा अभिनय पहायला मिळाला. अनेक महोत्सवातून त्यांच्यातील अस्सल मालवणी कलावंत पहायला मिळतो.
कणकवली तालुक्यातील वारगाव येथील विजय केसरकर सध्या एच.पी.सी.एल. मध्ये सिनियर मॅनेजर या पदावर कार्यरत आहेत. त्यांची सुरुवात पोस्ट कार्यालयातून 1982 मध्ये झाली. आणि आता ते एचपीसीएल सारख्या कंपनीत बड्या हुद्द्यावर कार्यरत असून सामाजिक, शैक्षणिक आणि धार्मिक क्षेत्रात कार्यरत आहेत. त्याबद्दल केसरकर यांचा गौरव करण्यात आला.
सिंधुदुर्गतील छोट्याशा गावातून अभिनयासाठी मुंबईला आलो. अभिनय करताना मालवणी टिकली पाहिजे, असे मनोमन वाटायचे, त्यासाठी संधी मिळेल तिथे मालवणीचा आग्रह धरला. खरं तर हा सन्मान मालवणी भाषेचा असून त्याचा सर्वाधिक आनंद वाटतो, असे दिगंबर नाईक म्हणाले.
तर कणकवलीचे सुपुत्र विजय केसरकर म्हणाले की, मुंबईमध्ये आलो त्यावेळी सर्वप्रथम पोस्ट कार्यालयात कामाला होतो. दिगंबर जठार यांच्यामुळे मुंबईला आलो. मला भारतीय पोस्ट खात्याचा अभिमान आहे. तिथून माझी सुरुवात झाली आणि आज एका बड्या कंपनीत सिनियर मॅनेजर म्हणून कार्यरत आहे.