सिंधुदुर्ग - जमिनीच्या वादातून झालेल्या मारहाणीतून एकाचा खून करण्यात आला. ही खळबळजनक घटना वेंगुर्ला दाभोली मोबारकरवाडी येथे गुरुवारी घडली. भानुदास मोर्जे असे खून करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी उपसरपंचासह चौघांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वेंगुर्ले पोलिसांना मृत भानुदास यांचा मुलगा सुदाम याने तक्रार दिली आहे. यामध्ये म्हटले आहे की, शैलेश पाटील, राजाराम कांबळी, भाई दाभोलकर हे सकाळी आमच्या जमिनीशेजारी आले. यावेळी त्यांनी आमच्या कुंपणाच्या लगत सिमेंटचे पोल पुरुन कुंपण घालण्यास सुरुवात केली. त्यावेळी आम्ही विचारणा केली असता, त्यांनी आम्हाला शिवीगाळ केली. त्यानंतर काही वेळाने उपसरपंच संदीप पाटील याने तेथे येऊन आम्हाला शिवीगाळ केली व कुंपण घालणारच, असे सांगितले.
यावेळी मी, वडील बाळकृष्ण, आई लक्ष्मी, भाऊ गौरव, माझी पत्नी अर्पिता असे आम्ही उपस्थित होतो. हा विषय उद्या सरपंचांसमवेत बसून मिटवूया, असे त्यांनी आम्हाला सांगितले. मात्र, याचा राग आल्याने संदीपने वडिलांना मारण्यास सुरुवात केली. त्यांना सोडविण्यासाठी आम्ही गेलो असता, त्या तिन्ही जणांनी आम्हा सर्वांना मारण्यास सुरुवात केली. तेवढ्यात संदीपने वडिलांना जोरात मारुन सिमेंटच्या पोलावर आपटले. त्यात ते जागीच मृत झाले. हे पाहून त्या चारही जणांनी तेथून पलायन केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान घटनेची माहिती कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. तसेच मृतदेहाचे वेंगुर्ले रुग्णालयात शवविच्छेदन केले आहे. मात्र, आरोपींना अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेह हलवू देणार नाही, असा आक्रमक पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे. वेंगुर्ला पोलीस ठाण्याचे निरीक्षक शशिकांत खोत यांनी पुढील तपास सुरू असल्याचे सांगितले. परिसरात तणाव वाढू नये, यासाठी जादा पोलीस कुमक तैनात करण्यात आल्याचेही ते म्हणाले. दुसरीकडे स्थानिक गुन्हा अन्वेषण पथक आरोपींच्या शोधासाठी रवाना केल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. दरम्यान या खळबळजनक घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी पोलीस ठाण्यात मोठी गर्दी केली.