सिंधुदुर्ग - जिल्ह्याच्या अनेक भागात आज पावसाच्या हलक्या सरी पडल्या आहेत. यावर्षी आधीच पाऊस लांबला त्यामुळे हापूसला पालवी आली आहे. परिणामी हापूसला मोहोरही उशिरा येणार आहे. त्यात अचानक ढगाळ वातावरण त्यात विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावल्याने हापूसवर कीटकांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता लक्षात घेता आंबा बागायदार भीतीच्या सावटाखाली आहेत.
विजांचा कडकडाट
अवकाळी पाऊस परतून आता दीड महिन्याचा कालावधी उलटला आहे. असे असताना आज अचानक जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. कणकवली, देवगड, सावंतवाडी, कुडाळ, वैभववाडी, वेंगुर्ले या तालुक्यांच्या परिसरात पावसाची रीप रीप पहायला मिळाली. अचानक दाखल झालेल्या पावसामुळे साऱ्यांचीच धांदल उडाली. विशेष म्हणजे विजांचा कडकडाट पाहता हा पाऊस नक्की मध्येच कसा परतला, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
जनजीवन विसकळीत
पावसामुळे जनजीवन मात्र विसकळीत झाले आहे. कणकवली तालुक्यात महामार्ग निसरडा झाल्याने काही दुचाकीस्वारांच्या गाड्या घसरण्याचे प्रकार घडले. तालुक्यात आज सकाळपासून ढगाळ वातावरण होते, तर दुपारी २पासून ढगांची दाटी झाली तीन वाजल्यानंतर शहर आणि तालुक्यात रिमझिम सरींना सुरुवात झाली. सध्या मुंबई-गोवा महामार्गाचे काम सुरू आहे, त्यामुळे महामार्गावरील धुळीचे चिखलात रूपांतर झाले. त्यामुळे काही दुचाकीस्वारांच्या गाड्या घसरल्या. सायंकाळी चार वाजेपर्यंत पावसाचा शिडकावा सुरू होता. अचानक आलेल्या पावसाने वातावरणात कमालीचा गारवा निर्माण झाला.
हापूसवर कीटकांचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती
देवगड हा जिल्ह्यातील हापूसचा बेल्ट आहे. या भागातही पावसाच्या सरी कोसळल्या. या वर्षी अवकाळी पाऊस उशिरापर्यंत होता. त्यामुळे ऐन थंडीच्या दिवसात हापूसला मोहोर येण्याऐवजी हापूसला पालवी आली आहे. त्यात ढगाळ वातावरण आणि पाऊस बरसल्याने हापूसवर कीटकांचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती देवगडमधील बागायतदारांनी वर्तवली आहे. यावर्षी आधीच कोरोनात हापूस बागायतदारांचे नुकसान झाले, त्यात पुन्हा पाऊस लांबला आणि आता यावेळी पावसाचे नैसर्गिक संकट बागायतदारांना चांगलेच डोकेदुखीचे ठरू शकते, असे बागायतदारांचे म्हणणे होते.