सिंधुदुर्ग - देवगड हापूस देशातच नाही, तर विदेशात देखील खूप प्रसिद्ध आहे. त्यामुळे येथील ऐतिहासिक शिवकालीन कुणकेश्वर शिवलिंग आणि नंदी सभोवताली ४ हजार देवगड हापूसची आकर्षक अशी आरास करण्यात आली आहे.
सध्या कोकणातील प्रसिद्ध हापूस आंब्याचा हंगाम सुरू आहे. मात्र, आंब्यावर वारंवार येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीमुळे येथील आंबा पिक संकटात सापडल्याची स्थिती आहे. त्यामुळे हवामान आणि हापूसचे अर्थकारण बदलावे आणि उत्पनात भरभराट होण्यासाठी देवगड मधील आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी देवगडचे आराध्यदैवत असलेल्या श्री क्षेत्र कुणकेश्वर चरणी ४ हजार आंब्यांचा नैवेद्य अर्पण केला. तर, मंदिर प्रशासनाने या नैवेद्याची आकर्षक अशी आरास सजवली आहे. ही आरास पाहण्यासाठी भाविक मोठी गर्दी करत आहेत.
सध्या उन्हाळी सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी देश-विदेशातून पर्यटक मोठ्या प्रमाणात कोकणात दाखल होत आहेत. त्यामुळे देवगड येथील प्रसिद्ध कुणकेश्वर मंदिरात देखील भाविक दर्शनासाठी भेट देत असतात. कुणकेश्वरमधील भगवान शंकराच्या पिंडी सभोवताली करण्यात आलेली हापूस आंब्याची आरास भाविकांसाठी मनमोहक ठरत आहे. तसेच भाविक आणि पर्यटकांना यानिमित्ताने हापुसची चव चाखण्याचा मोह देखील होत आहे.