सिंधुदुर्ग - मालवण येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयात कृषी पर्यवेक्षक म्हणून कार्यरत असलेल्या सचिन वसंत गवंडे (वय- ५५, रा. भरड मालवण) यांनी कार्यालयातच कीटकनाशक प्राशन केल्याची घटना आज बुधवारी घडली. गवंडे यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना उपचारासाठी ओरोस जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
ऑफिसमध्ये बेशुद्ध पडले -
सचिन गवंडे हे कृषी पर्यवेक्षक म्हणून कार्यरत आहेत. बुधवारी सकाळी त्यांच्या कार्यालयात स्टाफची साप्ताहिक बैठक सुरू होती. मात्र सचिन गवंडे या बैठकीत सहभागी झाले नव्हते. ते कार्यालयातच एका रूममध्ये बसून होते. दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास एका कर्मचाऱ्याने ते ऑफिसमध्ये बेशुद्ध पडल्याचे पाहिले. यावेळी सहकारी कर्मचाऱ्यांनी धावाधाव करून त्यांना उपचारासाठी खासगी गाडीने ग्रामीण रुग्णालयात आणले. याठिकाणी उपचार सुरू करताना त्यांनी कीटकनाशक प्राशन केल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यांच्यावर उपचार करून उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.