सिंधुदुर्ग - सावंतवाडी तालुक्यातील कारीवडे येथे रात्री बाराच्या सुमारास भक्ष्याच्या शोधात असलेल्या बिबट्याचा कुत्र्यांनी चांगलाच समाचार घेतला. कुत्र्यांच्या भीतीने हा बिबट्या थेट झाडावर चढला. गावातील कुत्र्यांनी पाठलाग केल्याने घाबरलेल्या बिबट्याने अखेर फणसाच्या झाडाचा आधार घेतला; आणि झाडाचा शेंडा गाठला.
सकाळी सहाच्या दरम्यान गावात रहदारी सुरू झाल्याने गावकऱ्यांच्या ही बाब लक्षात आली आणि त्या ठिकाणी बघ्यांची एकच गर्दी झाली. यानंतर बिबट्याची माहिती माहिती वनविभागाला देण्यात आली. काही वेळातच वनविभागाचे कर्मचारी बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा घेऊन दाखल झाले.
झाडावर चढून बसलेल्या बिबट्याला वनकर्मचाऱ्यांनी काठीने खाली उतरवण्याचा प्रयत्न केला. परंतु, माणसांची गर्दी, गोंगाट आणि शिकारी कुत्र्यांना पाहून बिथरलेल्या बिबट्याने अखेर उडी मारून जंगलात पळ काढला.