सिंधुदुर्ग - कणकवली तहसील कार्यालयातील मुद्रांक विक्रेत्यांकडून मुद्रांक देण्यास टाळाटाळ केल्याच्या घटनेवरून जिल्हाभर पडसाद उसळल्याची दखल घेत आज (दि. 20 ऑक्टोबर) दुय्यम निबंधक कणकवली व मुद्रांक विक्रेते यांची संयुक्त बैठक कणकवलीचे तहसीलदार रमेश पवार यांनी आयोजित केली. या बैठकीत मुद्रांक विकत नाही, त्या परवानाधारकांना तुमचा परवाना रद्द का करु नये, अशी नोटीस बजावण्याचे असे आदेश कणकवली तहसीलदारांनी दुय्यम निबंधक यांना दिले आहे.
शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी कणकवली तहसील येथे भेट देऊन जिल्हा निबंधक पी. डी. पिसाळ यांच्याशी संपर्क साधत सदर मुद्रांक विक्रेत्यांवर काय कारवाई केली, याची माहिती तातडीने द्या, अशा सक्त सूचना केल्या. आमदार नितेश राणे, शिवसेना नेते संदेश पारकर यांनी देखील या प्रकरणात दखल देत मुद्रांक विक्रेत्यांची मुजोरी नकोच, अशी भूमिका मांडली आहे.
कणकवली तहसीलदार रमेश पवार यांच्या दालनात दुय्यम निबंधक एम.एम. कुरुंदकर व कणकवलीतील मुद्रांक विक्रेत्यांचे संयुक्त बैठक आयोजित केली. या बैठकीला शिवसेना नेते संदेश पारकर, संदेश पटेल, मुद्रांक विक्रेते सुनील रेपाळ, कृष्णा परब, महेश पवार, भाग्यलक्ष्मी साटम, भालचंद्र साटम, संतोष जाधव आदी उपस्थित होते. तर काही मुद्रांक विक्रेते अनुपस्थित राहिले त्याबद्दल तहसीलदारांनी नाराजी व्यक्त केली. सोमवारी मुद्रांक विक्रेत्यांसमोर एवढ्या मोठ्या प्रमाणात गर्दी का झाली ? अशी विचारणा कणकवली तहसीलदार रमेश पवार यांनी मुद्रांक विक्रेत्यांना केली. त्यावर भालचंद्र साटम यांनी सोमवार असल्याने ही गर्दी झाल्याचे सांगितले. तसेच गेल्या वीस दिवसांत आपण किती मुद्रांक पेपर विकले? याची माहिती मुद्रांक विक्रेत्यांनी दिली.
दरम्यान, यावेळी सामाजिक कार्यकर्ते भगवान लोके यांनी मुद्रांक विक्रीबाबत सर्वसामान्य ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांच्या अडचणी येत आहेत. त्याचबरोबर कोणकोणत्या मुद्रांक विक्रेत्यांनी गेल्या वीस दिवसात किती मुद्रांक कोषागार विभागातून खरेदी केले? याची माहिती दिली. त्यामुळे 50 टक्के मुद्रांक विक्रेत्यांनी एकही मुद्रांक खरेदी केला नसल्याचे या बैठकीत उघड झाले.
यावेळी, कणकवली तहसीलदार रमेश पवार यांनी एम. एम. कुरुंदकर यांना ज्यांनी ज्यांनी मुद्रांक खरेदी केला नाही व नागरिकांना सेवा दिली नाही. या कारणातून त्यांना तातडीने नोटीसा बजावण्याचा प्रस्ताव जिल्हा निबंधकांकडे कारवाईसाठी पाठवण्यात यावा, अशा सूचना दिल्या. तसेच या बैठकीनंतर शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी कणकवली तहसील येथे भेट दिली. या भेटीत जिल्हा निबंधक पी.डी. पिसाळ यांच्याशी दूरध्वनीवरुन संपर्क साधला. कणकवली येथील मुद्रांक विक्रेताबाबत माध्यमांमध्ये जी झालेली चर्चा आहे. त्याबद्दल गंभीर दखल घ्यावी कणकवली येथे स्वतः भेट देऊन सदर मुद्रांक विक्रेत्यांनाबाबत चौकशी करावी. त्याचा अहवाल तातडीने मला देण्यात यावा, अशा सक्त सूचना जिल्हा निबंधकांना दूरध्वनीवरुन दिल्या आहेत.
तहसील कार्यालय येथे झालेल्या बैठकीत शिवसेना नेते संदेश पारकर यांनी जर कणकवली तहसील कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत असेल तर त्याचे विकेंद्रीकरण तालुक्यातील मोठ्या बाजारपेठांमध्ये करण्यात यावेत. या ठिकाणी नव्याने मुद्रांक परवाना देण्यात यावेत. या संदर्भात प्रस्ताव करण्यात यावा. या मुद्रांक विक्रेत्यांना गरज नसेल तर नव्याने काम करणाऱ्यांना संधी द्यावी. विनाकारण नागरिकांना वेठीस धरु नका. गरज आहे त्या नागरिकांना मुद्रांक मिळाले पाहिजेत, अशी मागणी या बैठकीत त्यांनी केली.
त्यावर कणकवली तहसीलदार रमेश पवार यांनी मुद्रांक विक्रेता आणि सकाळी दहा ते सहा या वेळेत मुद्रांक विकले पाहिजेत. नागरिकांची गैरसोय होता कामा नये मुद्रांक विक्रेते आहेत. त्यांनी आपल्याकडील मुद्रांक देऊन नागरिकांची सोय करावी. विनाकारण याठिकाणी नागरिकांना त्रास देऊ नये. कणकवलीत तहसीलदार कार्यालयामध्ये बसण्याची या सर्व मुद्रांक विक्रेत्यांना व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचा गैरफायदा कुठल्याही मुद्रांक विक्रेत्यांना घेऊ नये, अशा सूचना मुद्रांक विक्रेत्यांना दिल्या. तसेच त्याचा आढावा दररोज दुय्यम निबंधक कणकवली यांनी घ्यावा, असेही या बैठकीत त्यांनी सांगितले.
हेही वाचा - सिंधुदुर्गतील तेरेखोल नदीने गिळंकृत केला 200 एकर भूभाग; बांदा सरपंचांचा जलसमाधीचा इशारा