सिंधुदुर्ग - जिल्ह्यातील 70 ग्रामपंचायतींमधील 106 सदस्य बिनविरोध निवडून आल्याचे स्पष्ट झाले आहे. या जागांसाठी एकच अर्ज आले होते. उर्वरित 494 जागांसाठी 1 हजार 87 उमेदवार रिंगणात आहेत. या जागांसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे.
226 प्रभागातील 494 जागांसाठी 1 हजार 87 उमेदवार रिंगणात
जिल्ह्यातील 70 ग्रामपंचायतींमधील 600 जागांसाठी 1 हजार 550 अर्ज दाखल झाले होते. यातील 15 अवैध ठरले होते. उर्वरित 1 हजार 535 पैकी 342 जणांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे, 1 हजार 87 उमेदवार रिंगणात आहेत. 600 पैकी 106 जागांसाठी प्रत्येकी एकच अर्ज आल्याने या जागा बिनविरोध झाल्या. त्यामुळे, 226 प्रभागातील 494 जागांसाठी 1 हजार 87 उमेदवार रिंगणात आहेत. येथे अटीतटीची लढत आहे. अनेक ठिकाणी एकास एक याप्रमाणे भाजप विरुद्ध महाविकास आघाडी, तर काही ठिकाणी अपक्षांमुळे तिरंगी लढत होणार आहे.
जिल्ह्यात आता रणधुमाळी रंगू लागली
जिल्ह्यात आता खऱ्या अर्थाने रणधुमाळी रंगू लागली आहे. देवगड तालुक्यातील 23 ग्रामपंचायतींच्या 189 जागांसाठी 404 अर्ज वैध ठरले. त्यापैकी 55 अर्ज मागे घेण्यात आले असून, 307 उमेदवार निवडणूक लढवित आहेत. सावंतवाडी तालुक्यातील 11 ग्रामपंचायतींच्या 119 जागांसाठी 382 अर्ज पात्र होते. पैकी 117 अर्ज मागे घेतले असून, 265 उमेदवार रिंगणात आहेत. वैभववाडी तालुक्यातील 13 ग्रामपंचायतींमधील 103 जागांसाठी 234 अर्ज पात्र ठरले होते. पैकी 55 अर्ज मागे घेण्यात आले. 142 जण रिंगणात आहेत.
हेही वाचा - सिंधुदुर्गात टाकावू वस्तू पासून जैविक कोळशाची निर्मिती
सर्वांचे भवितव्य 15 जानेवारी रोजी सील बंद होणार
मालवण तालुक्यातील ६ ग्रामपंचायतींच्या 54 जागांसाठी 137 अर्ज पात्र ठरले. पैकी 28 अर्ज मागे घेण्यात आले असून, 105 जण मैदानात आहेत. कुडाळ तालुक्यात ९ गावातील 71 जागांसाठी 208 अर्ज वैध ठरले. पैकी 40 अर्ज मागे घेतले असून, 105 जण रिंगणात आहेत. कणकवली तालुक्यात ३ ग्रामपंचायतींच्या 21 जागांसाठी 49 अर्ज वैध ठरले. पैकी 17 अर्ज मागे घेण्यात आले. 21 जण निवडणूक लढवत आहेत. वेंगुर्ले तालुक्यातील 2 गावांमध्ये 18 जागांसाठी 55 अर्ज पात्र ठरले. पैकी 6 अर्ज मागे घेतले असून, 49 जण रिंगणात आहेत. दोडामार्ग तालुक्यातील 3 ग्रामपंचायतींच्या 25 जागांसाठी 66 अर्ज वैध ठरले. पैकी 24 अर्ज मागे घेण्यात आले असून, 34 जण मैदानात आहेत. या सर्वांचे भवितव्य 15 जानेवारी रोजी सील बंद होणार आहे.
तालुकानिहाय बिनविरोध सदस्य
देवगड आणि वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक जागा बिनविरोध झाल्या आहेत. देवगड 42, वैभववाडी 37, मालवण 4, कुडाळ 4, कणकवली 11 तर दोडामार्ग तालुक्यातील 8 जागांचा समावेश आहे. दरम्यान, अटीतटीच्या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि भाजप अशी लढत असली, तरी खऱ्या अर्थाने शिवसेना-भाजप अशीच दुरंगी लढत असल्याचे चित्र आहे. 70 पैकी कुठे सत्तांतर होणार आणि कुठे नाही, याची चर्चा रंगू लागली आहे.
हेही वाचा - 'नाणार प्रकल्प कोकणातून गेल्यास मोठे नुकसान'