सिंधुदुर्ग - जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी सोमवारनंतर होम आयसोलेशन बंद केले जाणार आहे. त्यासाठी 1 हजार 14 बेड उपलब्ध करण्यात आले आहेत. सामाजिक न्याय भवन आणि उच्च व तंत्रशिक्षण विभागाची वसतिगृहे ताब्यात घेतली जाणार आहेत, अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. सध्या जिल्ह्यात कोरोनावरील केवळ 1 हजार 170 डोस शिल्लक असल्याची माहिती देखील सामंत यांनी दिली.
सिंधुदुर्गात होम आयसोलेशन बंद -
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सद्यस्थितीत 1 हजार 14 एवढे बेड आहेत. त्यापैकी 386 बेड ऑक्सिजनचे आहेत तर, 67 व्हेंटिलेटर बेड आहेत. जिल्ह्यात अजून बेडची आवश्यकता भासल्यास उच्च व तंत्र शिक्षण विभागातील महाविद्यालयांची वसतिगृहे आणि सामाजिक न्याय विभागाची वसतिगृहे ताब्यात घेण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी कोरोना सेंटर सुरू करण्याचे निश्चित केले आहे. यापुढे कोरोना रूग्णाला घरी राहून उपचार घेण्यास मनाई करण्यात येणार आहे. होम आयसोलेशनमध्ये नियम पाळले जात नाहीत, अशा अनेक तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे संसर्गही वाढत आहे, असे निरीक्षणात आले आहे. त्यामुळे प्रत्येकाला शासकीय आयसोलेशनमध्येच उपचार घ्यावे लागणार आहेत, असे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस बिकट -
शनिवार आणि रविवारी कडक लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात 10. 1 टक्के एवढा वाढीचा दर आहे तर, जिल्ह्याचा मृत्यूदर 2.5 एवढा आहे. जिल्ह्यात सध्या 46 टक्के रूग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. 13 टक्के रूग्ण शासकीय आयसोलेशनमध्ये आहेत. जिल्ह्यातील या स्थितीमुळे दोन दिवस कडक लॉकडाऊन करणे आवश्यक आहे. यासाठी जनतेने सहकार्य करावे. दोन दिवसांच्या लॉकडाऊननंतर सोमवारी जिल्हाधिकारी बैठक घेणार असून या बैठकीत पुढील निर्णय घेण्यात येईल, असे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.
सिंधुदुर्गात कोरोना लसीचे 1 हजार 170 डोस शिल्लक -
जिल्ह्यात सद्यस्थितीत 1 हजार 170 एवढेच कोरोना लसीचे डोस शिल्लक आहेत. जिल्ह्यातील 56 केंद्रांपैकी केवळ तीन केंद्रांवर लस दिली जात आहे. उर्वरित सर्व केंद्रे बंद असून जिल्ह्यासाठी दोन लाख लसींची मागणी करण्यात आली आहे. ही मागणी वेळेत पूर्ण न झाल्यास जिल्ह्यातील लसीकरण पूर्णपणे बंद होईल. केंद्र शासन राज्य शासनाला लस पुरवते आणि राज्य शासन सर्व जिल्ह्यांना पुरवते, अशी स्थिती आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत रेमडेसिवीरची 1 हजार 470 इंजेक्शन उपलब्ध आहेत. त्यामुळे खासगी रुग्णालयांना इंजेक्शन्स आवश्यक असल्यास रुग्णांची सत्यता पटवून इंजेक्शन्स दिली जाणार आहेत, असे सामंत म्हणाले.