सिंधुदुर्ग - गेले दोन दिवस कोसळणाऱ्या पावसाचा फटका करूळ घाटाला बसला असून रस्ता खचल्याने करूळ घाटातील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. सिंधुदुर्गात गेले दोन दिवस सरासरी 262 मिमी पाऊस पडला. या मुसळधार पावसामुळे करूळ घाटात रस्ता खचून गेला. काल या घाटातून एकेरी वाहतूक सुरू ठेवण्यात आली होती. मात्र रस्ता अजून खचून जाण्याची शक्यता असल्याने 26 जुलैपर्यंत या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. दरम्यान आमदार नितेश राणे यांनी या घाटाची आज पाहणी केली असून प्रशासनाच्या चुकीमुळे हा घाट कोसळला असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
घाट मार्ग 26 जुलैपर्यंत राहणार वाहतुकीसाठी बंद -
मुसळधार पावसामुळे करूळ घाटातील दरीकडील बाजूने मोरी खचल्यामुळे रस्ता अधिकच खचत असल्यामुळे 26 जुलैपर्यंत करूळ घाट रस्ता वाहतुकीस पूर्ण बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडे हा मार्ग असून या मार्गाच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. कोकणला पश्चिम महाराष्ट्राशी जोडणारा हा महत्वाचा घाट असून हा मार्ग सध्या बंद असल्याने वाहतुकीची मोठी अडचण निर्माण झाली आहे. 26 जुलैपर्यंत अर्थात तेरा दिवसात खचलेल्या रस्त्यावर दुरुस्तीचे काम करून हा रस्ता वाहतुकीसाठी पूर्ववत केला जाणार आहे. तूर्तास या मार्गावरील वाहतूक फोंडाघाट आणि भुईबावडा घाटातून वळविण्यात आली आहे.
नितेश राणेंचा प्रशासनावर निशाणा करुळ घाटातील घटना प्रशासन निर्मित -आमदार नितेश राणे यांनी आज घाटाची अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली. यावेळी बोलताना त्यांनी करुळ घाटातील घटना प्रशासन निर्मित असल्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले कि, अतिवृष्टीत करूळ घाटाचे झालेले नुकसान हे प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे व दुर्लक्षामुळे झाले आहे. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला. खचलेला भाग दुरुस्तीसाठी 13 दिवस कशासाठी? एवढी वेळ का? जनतेला त्रास देण्याचे ठरवले आहे का? असा प्रश्नांचा भडीमार त्यांनी केला. लवकरात लवकर खचलेला भाग बांधून घ्या आणि मार्ग पूर्ववत करा. यात कोणतीही सबब चालणार नाही. अशी तंबी अधिकाऱ्यांना त्यांनी दिली. भुईबावडा घाट मार्ग हा पर्यायी मार्ग होऊ शकत नाही. त्या घाटाची अवस्था कधी बघितलाय का? 26 जुलैपर्यंत करुळ घाट बंद राहिला तर भुईबावडा घाटात रहदारी वाढू शकते आणि तो घाट कोसळण्याची भीती त्यांनी यावेळी व्यक्त केली.
अधिकाऱ्यांना तात्काळ काम करून वाहतूक पूर्ववत करण्याचा इशारा -
हा घाट मार्ग कोकण आणि पश्चिम महाराष्ट यांच्यातील वाहतुकीचा अत्यंत महत्वाचा दुवा आहे. तेव्हा तात्काळ काम करून हा मार्ग वाहतुकीला सुरू करावा, असे आमदार नितेश राणे यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. यावेळी नवी मुंबई येथील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण प्रमुख कार्यालयातील अधिकारी शेलार यांच्याशी आमदार नितेश राणे यांनी संपर्क साधत घाटाची परिस्थिती कथन केली. आपल्या विभागाच्या दुर्लक्षामुळे घाट खचला आहे. या कामाकडे प्रामुख्याने लक्ष द्या. त्वरित या मार्गावरील वाहतूक चालू झाली पाहिजे, असे त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. काम त्वरित चालू करून पूर्ण होईपर्यंत मी स्वतः अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहणार असल्याचे आमदार नितेश राणे यांनी सांगितले.