सिंधुदुर्ग - जिल्ह्यात थंडीला सुरुवात झाल्याने आंबा मोहोरासाठी पोषक वातावरण बनले आहे. मात्र लांबलेल्या पावसामुळे झाडांना पालवी आली आहे. त्यामुळे यंदाही हापूसचा हंगाम लांबण्याची शक्यता आहे. झाडांना आलेली पालवी टिकवून ठेवण्यासाठी बागायतदारांचे प्रयत्न सुरू आहेत.
लांबलेल्या पावसामुळे आंब्याला पालवी
यंदा पावसाचे प्रमाण सुरूवातीपासून समाधानकारक राहिले. मात्र अवकाळी पावसाने ऑक्टोबरपर्यंत हजेरी लावली. भातशेतीच्या दृष्टीने अखेरचा पाऊस अडचणीचा ठरला. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना अडचणीत आणल्याचे चित्र होते. पाऊस लांबल्याने आंबा हंगाम यंदा लांबणीवर जाण्याची अटकळ बांधली जात होती. मात्र आता किनारपट्टीवर आंबा हंगामाला पोषक वातावरण तयार होऊ लागले आहे. बदलते वातावरण आंबा बागायतदारांच्या दृष्टीने सुखावह ठरण्याची चिन्हे दिसत आहेत. तरीही झाडांना आता पालवी फुटू लागली आहे. किरकोळ प्रमाणात मोहोराचे तुरे दिसत असले तरीही त्याचे प्रमाण अत्यल्प आहे. झाडांना आलेली पालवी टिकवून ठेवण्यासाठी प्रयोगशील बागायतदारांची फवारणी सुरू झाली आहे. पालवी चांगली जून झाल्यास वेळीच मोहोर येईल अशा पद्धतीने नियोजन सुरू झाले आहे.
"पाऊस उशिरापर्यंत राहिल्याने आंबा कलमांना आता पालवी फुटली आहे. कलमांना आलेली पालवी जून होऊन त्यामधून मोहोर बाहेर येण्यास काही कालावधी जाईल. काही झाडांवर किरकोळ प्रमाणात मोहोर दिसतो; मात्र बहुतांशी झाडांना पालवी फुटली असल्याने यंदाचा हंगाम लांबण्याची शक्यता आहे." असे ज्येष्ठ आंबा बागायतदार हेमंत नेरुरकर यांनी सांगितले. तर मोहोर आल्यामुळे हापूस उशिरा येईल त्यामुळे हापुसला दर मिळणार नसल्याचे बागायतदार वैभव घाडी यांनी सांगितले. सध्या पालवी आलेली फांदी जोपर्यंत जून होत नाही तोपर्यंत तिला मोहोर येणार नाही. त्यामुळे यावर्षी आंबा हंगाम पुढे जाईल असे ते म्हणाले.