सिंधुदुर्ग - कुडाळ प्रांताधिकारी वंदना खरमाळे यांच्यावर आमदार वैभव नाईक यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी नेमलेल्या चौकशी समितीने क्लीन चिट दिली आहे. तरीही वंदना खरमाळे यांची पुन्हा महसूल विभागीय स्तरावर चौकशी होणार आहे, तसे आदेश पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले असल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणामध्ये बाधित झालेल्या प्रकल्पग्रस्तांना जमिनीचा मोबदला देताना कुडाळ प्रांत कार्यालयाने आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप आमदार वैभव नाईक यांनी केला होता. त्याबाबतचे पुरावे देखील सादर करत महामार्ग प्रकल्पग्रस्तांवर होणाऱ्या अन्यायाबाबत आवाज उठवला होता. त्यानंतर सदर प्रकरणाची चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी त्रिसदस्यीय समिती नेमली होती. या समितीने चौकशी अहवाल जिल्हाधिकारी यांना सादर केला. त्यात कुडाळ प्रांताधिकारी वंदना खरमाळे यांना क्लीन चिट देण्यात आली.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणात जमिनी गेलेल्या लाभार्थ्यांना केंद्र शासनाच्यावतीने चार पट मोबदला देण्यात येत आहे. अनेक बाधितांचा मोबदला देण्यात आलेला आहे. मात्र, कुडाळ प्रांताधिकारी कार्यालयात महामार्ग चौपदरीकरणात जमिनी गेलेल्या मालकांना शासनाने मंजूर केलेला मोबादला देण्यासाठी कुडाळ प्रांताधिकारी पैसे मागत आहेत, असा आरोप आमदार वैभव नाईक यांनी केला होता. याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दिली.
आमदार नाईक यांनी कुडाळ प्रांताधिकारी यांच्यावरच हा भ्रष्टाचाराचा थेट आरोप केला होता. त्यानंतर ३० जूनला कुडाळ शिवसेना तालुकाप्रमुख राजन नाईक यांनी या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी करत जिल्हाधिकाऱ्यांना लेखी निवेदन दिले होते. या निवेदनात ऑडिओ क्लिप आहे. तेथील कर्मचाऱ्यांना नुकसान रक्कम न मिळण्यात बँकेचा दोष नाही. प्रांत कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी पैसे मागत आहेत, असे सांगितले असल्याचे निवदेनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे हा प्रकार गंभीर आहे आणि यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार लपल्याची चर्चा सुरू होती. दरम्यान आता पालकमंत्री यांनी पुन्हा त्यांची विभागीय चौकशी होणार असल्याचे सांगितले आहे.