सिंधुदुर्ग - पंधरा दिवसात महामार्ग सुस्थित करण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या होत्या. त्याप्रमाणे येत्या आठ दिवसात महामार्ग व्यवस्थित होईल. नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन पालकमंत्री दिपक केसरकर यांनी सिंधुदुर्गात पत्रकार परिषदेत बोलताना केले. प्रशासकीय पातळीवर काम सुरू असताना इतर काही करण्याची आवश्यकता नव्हती असा टोला नितेश राणे यांना लगावला. काम बंद पाडणे, टेलिफोन यंत्रणा दुरुस्ती कामगांराना मारहाण यामुळे कामाला विलंब झाल्याचे केसरकर यांनी सांगितले.
कणकवली ब्रिजचे काम स्वार्थापोटी चार महिने अडविण्यात आले. अन्यथा वेळीच कामाला सुरुवात होऊन पावसाळ्या पूर्वीच कणकवलीच्या रस्त्यांचा प्रश्न मिटला असता. कणकवलीत टेलिफोन यंत्रणा सुरळीत करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, यंत्रणा सुरळीत करण्याचे काम सुरू असताना कंत्राटदाराच्या कामगारांना मारहाण करण्यात आली. त्यांची गाडीही फोडण्यात आली. त्यामुळे ते काम अर्धवट राहीले. मात्र, आता पुढील चार दिवसात टेलिफोन यंत्रणा सुरळीत करण्यात येईल, असे पालकमंत्री केसरकर यांनी स्पष्ट केले.
सर्व्हिस रोडवर गाड्यांचे पार्किंग, फुलवाले व अन्य फेरीवाल्यांचे अतिक्रमण होत असल्याने त्यांना पर्यायी व्यवस्था करून देण्याचा सूचना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्नही सुटेल असा विश्वास पालकमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. नितेश राणेंनी केलेले आंदोलन आणि चिखलफेक प्रकरणानंतर नागरिकांमधून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. त्या पार्श्वभूमीवर केसरकर यांनी चिखलमय महामार्गाबाबत प्रशासनाची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला.