सिंधुदुर्ग - कोरोनाच्या महामारीमध्ये राज्यसरकार, जिल्हाप्रशासन तसेच सत्ताधारी पक्षाचे पालकमंत्री आणि आमदार यांच्याकडून सातत्याने बेजबाबदार कृत्य होत आहेत. एका बाजूला आरोग्यमंत्री रत्नागिरीत कोरोनाचा डेल्टा प्लस रुग्ण आढळल्याचे सांगत असताना रत्नागिरीचे स्थानिक आमदार आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत हे सांगतात, की रत्नागिरीला पेशंटच नाहीत. परंतु, त्याचवेळी सिंधुदुर्गातही डेल्टा प्लसचा रुग्ण आढळून येतो. मग पालकमंत्री ही बाब लपवून का ठेवत आहेत ? असा सवाल भाजपा आमदार नितेश राणे यांनी केला आहे.
पालकमंत्र्यांनी जबाबदार पद्धतीने पालकत्व निभावले पाहिजे -
कोरोनाची दुसरी लाट संपून आता तिसरी लाट येवू पाहतेय. ती येवू नये म्हणून सरकारने प्रयत्न केले पाहिजेत. त्याबाबतीत सत्य लपवून आणि लोकांना फसवून काहीच अर्थ नाहीय. सगळ्याच बाबतीत हातसफाई करून उपयोग नाही. हे जर रोखायचं असेल, तर बाधीत रुग्णाच्या संक्रमण मार्गाचा आणि त्याच्या आजूबाजूच्या परिस्थितीचा आढावा घेवून तिसरी लाट कशी थांबवता येईल, यादृष्टीने जिल्हाप्रशासनाने काम केलं पाहिजे आणि पालकमंत्र्यांनी जबाबदार पद्धतीने पालकत्व निभावलं पाहिजे, असे आम. नितेश राणे यांनी म्हटले आहे. तर पालकमंत्री आणि आमदार यांच्याकडून सातत्याने बेजबाबदार कृत्य होत आहेत. एका बाजूला आरोग्यमंत्री रत्नागिरीत कोरोनाचा डेल्टा प्लस रुग्ण आढळल्याचे सांगत असताना रत्नागिरीचे स्थानिक आमदार आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत हे सांगतात, की रत्नागिरीला पेशंटच नाहीत. परंतु त्याचवेळी सिंधुदुर्गातही डेल्टा प्लसचा रुग्ण आढळून येतो. डेल्टा प्लस रुग्णाबाबत पालकमंत्री उदय सामंत माहिती लपवत आहेत. असेही ते म्हणाले.
दोन दिवसांचे पावसाळी अधिवेशन म्हणजे निव्वळ धुळफेक -
महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून जनतेच्या कोणत्याच प्रश्नांना न्याय मिळालेला नाहीय. आताही जनतेच्या प्रश्नांचा अक्षरशः डोंगर उभा असताना फक्त दोनच दिवस पावसाळी अधिवेशनाची घोषणा करण्यात आली आहे. खरंच महाविकास आघाडीच्या सरकारला जनतेच्या प्रश्नांची काळजी आहे? की केवळ स्वतःचे सरकार वाचवण्यासाठी धडपड चालली आहे, हेच अजून स्पष्ट होत नाहीय. ज्यापद्धतीने केवळ दोन दिवस अधिवेशन घेतले जातेय, त्यातून हेच दिसतेय, की काहीतरी फसवायचेय आणि खोटे बोलायचेय. हे दोन दिवसांचे पावसाळी अधिवेशन म्हणजे निव्वळ धुळफेक आहे, अशी टिका भाजपा आमदार नितेश राणे यांनी केली आहे.
तर सरकारने तीन-चार आठवडे अधिवेशन घ्यावे -
राज्यसरकार पारदर्शक काम करत असेल, मुख्यमंत्री बेस्ट सी. एम. म्हणून ओळखले जात असतील, सरकारच्या कामाचा सगळीकडे गवगवा आहे, असे जर राज्यसरकारला वाटत असेल, तर सरकारने तीन-चार आठवडे अधिवेशन घ्यावे. जनतेचे प्रश्न आम्हा लोकप्रतिनिधींना मांडू द्यावेत. जनतेच्या प्रश्नांना न्याय द्यावा. यासाठीच तर अधिवेशन घेतले जाते, असे आमदार नितेश राणे यांनी म्हटले आहे.
हेही वाचा - Delta Plus : काय आहे 'डेल्टा' आणि 'डेल्टा प्लस' व्हेरियंट?