सिंधुदुर्ग - देशभरात लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे काजू उत्पादकांवर ऐन मोसमात संकट ओढावले आहे. त्यातच केंद्र सरकारचा देखील देशातील २७ कीटकनाशकांवर बंदी घालण्याचा विचार आहे. यामुळे शेतीच्या उत्पादनावर प्रभाव पडणार आहे. फळ बागायतदारांना देखील याचा मोठ्या प्रमाणात फटका बसणार आहे. मात्र, जिल्ह्यातील काजू उत्पादकांमध्ये कीटकनाशक बंदीबाबत संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत.
कोरोनामुळे घसरलेला दर तसेच कमी किमतीची, मात्र बंद होण्याची शक्यता असलेली कीटकनाशके या दोन्ही कारणास्तव येत्या काळात मोठ्या बागायदारांसमोर अनेक प्रश्न निर्माण करणार असल्याचे मत काहींनी व्यक्त केले आहे. तर काही बागायतदारांना सेंद्रीय शेती हा महत्वाचा पर्याय वाटत आहे.
बागायतदारांना शेतीपूरक वस्तूंचा पुरवठा करणारे वेंगुर्ल्यातील राकेश आंबेकर यांनी सर्व औषधांवरील दर २० टक्क्यांनी वाढवल्याचे सांगितले. त्यामुळे आधीच महाग झालेली कीटकनाशके आणखी महाग होण्याची शक्यता आहे, असे ते म्हणाले. यातच सध्या बाजारात अनेक औषधांचा व खतांचा तुटवडा आहे. यामुळे बागायतदारांसमोर काय करावे, असा प्रश्न आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात काजूचे क्षेत्र हापूसच्या तिप्पट आहे. सुमारे ७२ हजार हेक्टर वर काजूच्या बागा आहेत. जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांचे अर्थकारण काजू बागांवर अवलंबून आहे. मागील दहा वर्षांत काजू लागवडीच्या क्षेत्रात झपाट्याने वाढ झाली. दरवर्षी ५ हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात येते. मागील काही वर्षांत काजूला चांगला दर मिळत होता. त्यामुळे बहुतांशी शेतकऱ्यांनी काजू लागवडीत पैसे गुंतवले. काजू हे एकमेव पीक संपूर्ण जिल्ह्यात घेतले जाते. १ हजार २०० ते १ हजार ५०० कोटींची आर्थिक उलाढाल होत असते.
जिल्ह्यात काजू पीक प्रामुख्याने डोंगरी भागात होते. कीटकनाशकांचा मानवी जीवनावर होणार परिणाम लक्षात घेता सेंद्रिय शेती हाच योग्य पर्याय असल्याचे कणकवली तालुक्यातील प्रयोगशील काजू बागायदार गौतम तांबे सांगितले. ते पियाळी गावचे रहिवासी असून अनेक वर्षांपासून काजूची शेती करत आहेत. शासनाचा निर्णय योग्य असून काजूची शेती सेंद्रिय पद्धतीनेच व्हावी, असे ते म्हणाले.
अतिवृष्टी, क्यार वादळ आणि त्यानंतर सततचे ढगाळ वातावरण यामुळे यावर्षी काजू उत्पादनात ४० टक्के घट झाली आहे. साधारणत: जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यानंतर जिल्ह्यात काजू हंगामाला सुरुवात झाली. काजू हंगाम सुरू झाल्यानंतर प्रतिकिलो १४० रूपये दर होता. त्यानंतर फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात काजुला चांगला बहर येतो. हा बहर येत असतानाच कोरोनाचे संकट आले. त्यामुळे व्यापाऱ्यांनी काजू खरेदी करणे बंद केले. याच संधीचा फायदा घेऊन काही व्यापाऱ्यांनी काजूचा दर ७० ते ७५ रुपयांवर नेऊन ठेवला. त्यामुळे बागायतदारांनी काजू विक्री केली नाही. शेतकऱ्यांनी प्रतिकिलो १२० रुपयांपेक्षा कमी दराने काजूची विक्री करू नये, असे आवाहन करण्यात आले. यासाठी तालुकानिहाय बैठका सुरू झाल्या. परंतु अद्याप काजुची विक्री होताना दिसत नाही. सद्या जिल्ह्यातील बागायतदारांकडे कोट्यवधी रुपयांचा काजू पडून आहे.
याच पार्श्वभूमीवर कणकवली बिडवाडी येथील प्रगतशील काजू बागायतदार डी. डी. कदम यांनी इतर पिकाप्रमाणे काजूवरही कीटक व बुरशीचा प्रादुर्भाव जाणवू लागल्याचे सांगितले. सर्व पिकात काजू हे शाश्वत पीक वाटत होते. मात्र, आता दर कोसळला आहे आणि हे संकट कधीपर्यंत राहील याची शाश्वती नसल्याचे अनिश्चितता वाढली आहे, असे ते म्हणाले. पर्यायी स्वस्त औषधे देऊन शासनाने बागायतदार आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी त्यांनी केलीय. अनेक संकटांनी आधीच कोकणातील बागायतदारांची आर्थिक परिस्थिती कोलमडली असून त्याला ठोस पर्याय उपलब्ध करून देण्याची गरज आहे.