सिंधुदुर्ग - गेल्या १० वर्षात प्रथमच नोव्हेंबर महिन्यात भात खरेदीचा शुभारंभ होत आहे. चांदा ते बांदा योजना व कृषी यांत्रिकीकरण योजनांचा मोठ्या प्रमाणात लाभ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देण्यात आला असून शेतकऱ्यांनी यांत्रिकीकरणाद्वारे सरी पद्धतीने मोठ्या प्रमाणात भात लागवड केली. त्यामुळे भाताचे उपन्न वाढले आहे. भात खरेदी केंद्राचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. तसेच कृषीविषयक इतर योजनांचा लाभ शेतकऱ्यांना मिळवून देण्यात येईल त्याचप्रमाणे यावर्षी उच्चांकी भात खरेदी करण्याचा प्रयत्न करणार असून गतवर्षी शासनामार्फत ३६ हजार क्विंटल भात खरेदी करण्यात आला, परंतु यंदा ६० हजार क्विंटल भात खरेदी करण्याचा संकल्प असल्याचे आमदार वैभव नाईक यांनी म्हटले आहे.
भात खरेदीसाठी जिल्ह्यात ४२ केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. गतवर्षी शेतकऱ्यांना क्विंटलमागे १८१५ रुपये हमीभाव देण्यात आला होता. तसेच त्यावर ७०० रुपये बोनस मिळून २५१५ रुपये दर देण्यात आला होता. यावर्षी शासनाने हमीभावात ५३ रुपयांची वाढ केली असून १८६८ रुपये हमीभाव लागू करण्यात आला आहे. तसेच बोनस स्वरूपात गतवर्षीपेक्षा जास्तीत जास्त रक्कम मिळवून देण्यासाठी शासनाकडे प्रयत्न केले जाणार असल्याचे आमदार वैभव नाईक यांनी सांगितले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवजे या ग्रामीण भागातील सोसायटीमध्ये प्रथम भात खरेदीचा शुभारंभ केला त्याबद्दल जिल्हा परिषद गटनेते नागेंद्र परब यांनी आमदार वैभव नाईक यांचे आभार मानले. उपसभापती जयभारत पालव, सदस्य श्रेया परब यांनीही मनोगत व्यक्त करत शेतकऱ्यांनी भात खरेदी केंद्राचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
हेही वाचा- कुंभार व्यावसायिक ग्राहकांच्या प्रतिक्षेत; मातीचे दिवे तसेच पडून