पणजी - गोव्यात कोरोनाने कमावता गेलेल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबाला २ लाखांची मदत जाहीर करतानाच, गोव्याच्या कायद्यातून दीव- दमन शब्द वगळला जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आजच्या गोव्याच्या घटक राज्य दिनानिमित्त केली आहे. तर स्वयंपूर्ण गोव्याची हाक देताना त्यांनी दहावी व त्यावरील शिक्षण घेणाऱ्या अनाथ मुलांसाठी मोफत लॅपटॉप योजना जाहीर केली आहे. राज्यात येत्या ३ जूनपासून १८ ते ४४ वयोगटातील लोकांचे लसीकरण सुरु होणार असल्याचेही ते म्हणाले.
मुख्यमंत्री अनाथ आधार योजनेची घोषणा
यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी गोवा राज्य स्वयंपूर्ण करण्यासाठी गोमंतकियांनी सरकारला सहकार्य करावे असे आवाहन देखील केले आहे. तसेच राज्य सरकार गोव्याला स्वयंपूर्ण करण्यासाठी देखील कटीबद्ध असल्याचेही ते म्हणाले आहेत. गोव्याला घटक राज्याचा दर्जा मिळण्यापूर्वी गोवा हा संघ प्रदेश होता. गोवा दमण व दीव असे त्याचे नाव होते. त्यामुळे गोव्यातील अनेक कायदे हे त्याच नावाने आहेत. हे कायदे गोव्यासाठी आहेत त्यामुळे यापुढे फक्त गोवा हेच नाव राहील, दमण व दिव वगळले जाईल अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
३ जूनपासून १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण - सावंत
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील ४५ वर्षांवरील सर्व लोकांचे लसीकरण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी पुन्हा टिका उत्सव सुरू केला असून, त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. १८ ते ४५ वयोगाटातील नागरिकांचे देखील लसीकरण करण्यात येणार आहे. येत्या 3 जूनपासून या लसीकरणाला सुरुवात होईल. २ वर्षांखालील मुलांच्या पालकांना, व्याधीग्रस्त लोकांना, रिक्षाचालक, टॅक्सी चालक, पायलट, दिव्यांग व खलाशांना लस प्राधान्याने देण्यात येणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले आहेत.
तौक्ते चक्रिवादळातील नुकसानग्रस्तांना मदतीचे वाटप - सावंत
तौक्ते चक्रीवादाळात राज्याचे मोठे नुकसान झाले. १९९४ नंतर एवढे मोठे वादळ गोव्यात आले. या वादळात सरकारी व खासगी मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ज्यांचे नुकसान झाले त्यांच्यासाठी मदतीचे सुमारे 70 टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित बाधितांना देखील मदतीचे वाटप सुरू आहे. बांधकाम व वीज खात्याला तौक्तेचा मोठा फटका बसला, मात्र अशाही परिस्थितीमध्ये संबंधित खात्याच्या कर्मचाऱ्यांनी केलेले काम कौतुकास पात्र आहे. राज्यात सध्या कोरोनाची लाट ओसरत आहे, मात्र गोवा कोरोनामुक्त करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे देखील यावेळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी म्हटले आहे.
हेही वाचा - 'ही' गोष्ट लागू केल्यास पेट्रोलच्या किंमती होतील स्थिर; अर्थतज्ञांनी सुचवला मार्ग