सिंधुदुर्ग - गोवा मेडिकल कॉलेजमध्ये उपचार घेणाऱ्या २६ रुग्णांचा ऑक्सिजन अभावी मृत्यू झाल्याची घटना घडल्याचा दावा करण्यात येत आहे. यानंतर आज (मंगळवारी) गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोवा मेडिकल कॉलेजमध्ये भेट दिली. आपल्याकडे पुरेसा ऑक्सिजन उपलब्ध आहे. मात्र, तो रुग्णांना वेळेत लावला गेला नसल्याने मृत्यू होताहेत का याचा तपास केला जाईल? असे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्वतः प्रत्येक वार्डमध्ये जाऊन रुग्णांची विचारपूस केली.
गोव्यात पुरेसा ऑक्सिजन -
गोवा राज्याकडे ऑक्सिजनची अजिबात कमतरता नाही. राज्याकडे पुरेसा ऑक्सिजन आहे. मात्र, हा ऑक्सिजन रुग्णांपर्यंत वेळेत पोहोचतो का? याची आम्ही माहिती घेत आहोत. जर रुग्णाला ऑक्सिजन वेळेत मिळत नसेल तर तो असून काहीच फायदा नाही, असेही मुख्यमंत्री प्रमोद सावंत यावेळी म्हणाले. गोवा मेडिकल कॉलेजमध्ये गैरव्यवस्थापन कारभार आहे का? याचीही माहित आम्ही घेत आहोत. मात्र, यापुढे ऑक्सिजन अभावी रुग्ण मारणार नाही, याची आम्ही खात्री देतो, असेही ते म्हणाले.
जीएमसीएचमध्ये ऑक्सिजन पुरवठा कमी झाला होता
जीएमसीएचमध्ये रात्री २ ते सकाळी ६ वाजेपर्यंत २६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या घटनेचा तपास करण्यात येणार असल्याचे गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी सांगितले. तर रुग्णांच्या मृत्यूमागील कारण उच्च न्यायालयाने शोधावे, असे आरोग्यमंत्र्यांनी म्हटले आहे. उच्च न्यायालयाने हस्तक्षेप करत जीएमसीएच रुग्णालयाला करण्यात आलेल्या ऑक्सिजन पुरवठ्याबाबत श्वेतपत्रिका काढावी. त्यामुळे योग्य गोष्टी होतील, असे आरोग्यमंत्र्यांनी म्हटले आहे. याबाबत मुख्यमंत्री प्रमोद सावंत याना विचारले असता, रुग्णालयाला भेट देणारे आपण कदाचित पहिला मुख्यमंत्री असू. यावेळी आपण रुग्णांशी बोललो आहोत. कोरोना वॉर्डमध्ये रात्री ऑक्सिजनच्या पुरवठ्यामुळे काही रुग्णांना गंभीर समस्या उद्भवली असण्याची शक्यता आहे. सोमवारी रात्री जीएमसीएच रुग्णालयाला ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाला होता. तो का झाला याची चौकशी केली जाईल, असेही ते यावेळी म्हणाले.
हेही वाचा - दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात टँकर मधून ऑक्सिजन गळती; जीवितहानी नाही
रुग्ण गंभीर झाल्यावर रुग्णालयात येतात -
यावेळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी रुग्ण गंभीर झाल्यावर रुग्णालयात येत असल्याचे म्हटले आहे. जीएमसीएचमध्ये चांगले डॉक्टर आहेत. ते अत्यंत मेहनतीने काम करत आहेत. आपण रुग्णांशी बोलल्यानंतर येथील डॉक्टर चांगली सेवा देत असल्याचे आपल्या लक्षात आले आहे. मात्र, रुग्णांनी आपल्याला लक्षण दिसायला लागल्यावर वेळ न घालवता तत्काळ रुग्णालयात दाखल व्हावे, असेही ते यावेळी म्हणाले. रुग्णांनी वेळेत दाखल न होणे ही त्यांची चूक असल्याचेही ते म्हणाले.
तर खासगी रुग्णालयावर कारवाई होणार -
खासगी रुग्णालयात कोरोना रुग्णांना घेतले जात नसल्याबाबत माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारले असता, अशा रुग्णालयाबाबत तक्रार आल्यास आपण तत्काळ कारवाई करू. सरकार या साथीच्या काळात खासगी रुग्णालयांना सुविधा देत आहे, अशावेळी जर रुग्णांना ही रुग्णालये मागे पाठवत असतील तर सरकार गप्प बसणार नाही. संबंधित खासगी रुग्णालयावर कारवाई केली जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.
हेही वाचा - गोवा : ऑक्सिजनअभावी २६ जणांचा मृत्यू ? उच्च न्यायालयाने चौकशी करण्याची सरकारची मागणी