सिंधुदुर्ग - जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी भाताची रोपे तयार करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, किनळोस येथे गव्यांकडून तरव्यांची(भाताची रोपे) मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे लावणीसाठी तरवा कमी पडणार असून दुबार पेरणीचे संकट ओढवण्याची शक्यता आहे. या परिसरातील शेतकरी गव्यांच्या उपद्रवाने त्रस्त झाले आहेत.
किनळोस परिसरात खरीप भात लावणीच्या कामास प्रारंभ झाला आहे. भात लावणीचा हंगाम आटोक्यात आणण्यासाठी येथील शेतकरी प्रयत्नशील आहेत. मात्र, वन्य प्राण्यांच्या रूपाने त्यांच्यासमोर संकट उभे राहिले आहे. लागवडीस योग्य झालेल्या तरव्यांचे गेल्या काही दिवसांपासून गव्यांकडून मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. गेल्या दोन दिवसात गव्यांनी बहुतांश तरवा खाऊन फस्त केला आहे.
या गव्यांच्या कळपात आठ ते दहा गवे असल्याची शेतकरी वर्गात चर्चा आहे. गवे आणि रेडे दिवसा आसपासच्या घनदाट जंगलाचा आश्रय घेतात व रात्र झाली की, शिवारात उतरून पिकांचे नुकसान करत आहेत. त्यामुळे तरव्यांची कमतरता निर्माण होण्याचा धोका आहे. लावणीसाठी पुरेसा तरवा उपलब्ध होण्यासाठी शेतकऱ्यांना आता दुबार पेरणी करावी लागणार आहे.