सिंधुदुर्ग - अनेक जणांच्या आयुष्यात त्यांची काही स्वप्न असतात. ही स्वप्ने पूर्ण करण्यासाठी अनेकजण खडतर प्रयत्न करतात. काहींना यश येत, तर काहींना नाही. मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रज्वल कुलकर्णी याने स्वप्न पाहिले आणि ते सत्यताही उतरवले. सिंधुदुर्गच्या या पुत्राने भारतीय हवाई दलात फायटर पायलट बनण्याचे स्वप्न कठोर मेहनतीनंतर साकारतानाच स्वॉर्ड ऑफ ऑनर हा बहुमानही पटकावला आहे.

वायुसेना अध्यक्षांच्या हस्ते स्वीकारला स्वॉर्ड ऑफ ऑनरचा बहुमान
सिंधुदुर्गचा सुपुत्र असलेल्या प्रज्वल कुलकर्णी याने अगदी शालेय जीवनात फार मोठं स्वप्न पाहिलं आणि तब्बल अकरा वर्षाच्या खडतर तपश्चर्येनंतर त्याने ते स्वप्न सत्यात सुद्धा उतरवलं. हे स्वप्न होतं जगातील चौथ्या क्रमांकाची बलाढ्य वायुसेना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतीय वायु सेनेत फायटर पायलट बनण्याचे. प्रज्वलने हे स्वप्न सत्यात उतरवताना वायुसेना अकादमीमध्ये सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थीसाठी दिला जाणारा स्वॉर्ड ऑफ ऑनर हा बहुमान सुद्धा पटकावला. नुकत्याच तेलंगणा मधील दिंडीगल येथील एअरपोर्ट अकादमीत पासिंग आऊट परेड पार पडली. या परेडमध्ये सिंधुदुर्गच्या प्रज्वल कुलकर्णी याला वायुसेना प्रमुख एअर चीफ मार्शल राकेशकुमार भदूरिया यांच्या हस्ते ही सर्वोच्च मानाची तलवार देऊन गौरवण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथील अनिल कुलकर्णी आणि प्रज्ञा कुलकर्णी यांचा प्रज्वल हा एकुलता एक मुलगा. प्रज्वलच्या यशाबद्दल भावना व्यक्त करायला आमच्याकडे शब्दच नाहीत आणि हा बहुमान केवळ सिंधुदुर्गचा नसून संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा आहे, असे असे विचार प्रज्वलच्या पालकांनी व्यक्त केले.

