सिंधुदुर्ग - जिल्ह्यातील सर्वात मोठा देवगड येथील २१ मार्चपासून बंद असलेला मासळी लिलाव अखेर प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाला. शासनाने घालून दिलेल्या अटी आणि शर्थीचे पालन केले जावे, असे आदेश यावेळी देण्यात आले आहेत. या निर्णयामुळे मच्छिमार बांधव सुखावले आहेत. देवगडमध्ये मासळी हंगामात सुमारे 10 लाख टन मत्स्य उत्पादनाचा लिलाव केला जातो.
देवगड मध्ये २५० हून अधीक ट्रॉलर्स असून तितक्याच पाती मत्स्य व्यवसायात गुंतल्या आहेत. दोन पर्सिनल नेट ट्रॉलर्सही आहेत. येथे स्थानिक आणि बाहेरचे मिळून १५ हजार लोकांची वस्ती आहे. देवगडमध्ये चार मत्स्य सहकारी संस्था आहेत. कोरोनाच्या संकटामुळे येथील मासळीचा लिलाव बाजार बंद करण्यात आला होता. हा बाजार २० एप्रीलला म्हणजे २९ दिवसानंतर सुरु झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या सूचनेनुसार या ठिकाणी सामाजिक अंतर राखण्यासाठी लिलाव बाजाराची शासनाच्या नियमाप्रमाणे मांडणी करण्यात आली होती. देवगड हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मासळी उत्पादनाचे मोठे बंदर आहे. या ठिकाणाहून पुणे, कोल्हापूर, गोवा, बेळगाव आदी ठिकाणी मासळी जाते. बोटी लावायलाही देवगडचे बंदर सुरक्षित असून या ठिकाणी मच्छिमार बोटी मोठ्याप्रमाणावर आपला माल उतरवतात. दरम्यान हि लिलाव प्रक्रिया पोलीस बंदोबस्तात सुरु करण्यात आली. जिल्ह्यातून खरेदीदार मोठ्या संखेने या ठिकाणी आले होते.