सिंधुदुर्ग - जिल्ह्यात झालेली अतिवृष्टी, पूरपरिस्थिती आणि क्यार चक्रीवादळाचा तडाखा यामुळे भातपिकाचे 90 टक्क्यापर्यंत नुकसान झाले आहे. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तत्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी. तसेच शेतकऱ्यांनी घेतलेले 80 कोटींचे शेती पीक कर्ज व्याजासहीत माफ करावे, अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत यांनी निवेदनाद्वारे राज्य सरकारकडे केली आहे. पत्रकार परिषद घेऊन त्यांनी याबाबतची माहिती दिली.
ऑगस्टमध्ये जिल्ह्यात झालेली अतिवृष्टी-पूरपरिस्थिती तसेच चक्रीवादळाच्या तडाख्याने जिल्ह्यातील भातशेती नष्ट झाली आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे जिल्ह्यातील शेतकरी पूर्णतः आर्थिकदृष्ट्या कोलमडून गेलेला आहे. त्यामुळे तत्काळ नुकसानीचे पंचनामे करावे. तसेच शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 50 ते 60 हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी. मात्र, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी अल्पभूधारक असल्याने गुंठ्यांवर आधारित ही नुकसान भरपाई असावी. तसेच बऱ्याच ठिकाणी शेतकरी कसत असलेले क्षेत्र हे देवस्थान इनाम किंवा कुळ अथवा तोंडी कराराने कसत असतात. याबाबत लागवड केलेल्या शेती क्षेत्रांची शासन स्तरावरून खात्री करावी आणि त्यांनाही नुकसान भरपाई मिळावी.
नारळी पौर्णिमेनंतर मासेमारीला सुरुवात झाली. मात्र, क्यार व त्यानंतर उद्भवणारी इतर चक्रीवादळे यामुळे २० टक्के सुद्धा मासेमारी झालेली नाही. त्यामुळे मच्छिमारांच्या नुकसानीची पाहणी करून योग्य ती नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणीही सावंत यांनी केली आहे.