सिंधुदुर्ग - तळकोकणाला सलग चौथ्या दिवशी मुसळधार पावसाने झोडपले. रात्री तसेच शनिवारी दिवसभर पावसाचा जोर कायम असल्याने जिल्ह्यातील ओहोळ, नदी-नाल्याच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे. गेल्या २४ तासात जिल्ह्यात सरासरी १००.६२ मिमी पाऊस पडला आहे.
मागील वर्षी जिल्ह्यात ३० जूनपर्यंत १३१५ मी.मी. पाऊस झाला होता. मात्र, यावर्षी ६०० मिली मीटरच पाऊस झाला आहे. मुसळधार पावसाने सर्वच तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले. मालवण तालुक्यातील कातवड धुरीवाडी येथील साकव मुसळधार पावसामुळे मोडून पडला. यामुळे येथून ये-जा करणाऱ्या ग्रामस्थांची मोठी गैरसोय झाली आहे. तर सर्जेकोट येथील लक्ष्मी धर्माजी आरोलकर या महिलेच्या घरावर पहाटे फणसाचे झाड पडल्याने हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. मालवणसह जिल्हाभरात अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या आहेत. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत. तर नद्यांच्या पाणीपातळीत कमालीची वाढ झालेली आहे.
देवगड तालुक्यात सर्वाधिक पाऊस
गेल्या चोवीस तासात जिल्ह्यात १००.६२ मिलीमीटर सरासरी पाऊस झाला आहे. देवगड तालुक्यात सर्वाधिक म्हणजेच १४७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर दोडामार्ग- १०५, सावंतवाडी- ७२, वेंगुर्ला- ८५ कुडाळ- ८८, मालवण- ६१, कणकवली- ११० आणि वैभववाडी- १३७ मिमी एवढा पाऊस झाला आहे.
आंबोली धबधबा कोसळण्यास सुरूवात
सावंतवाडी-आंबोलीमध्ये अनेक नयनरम्य पर्यटन स्थळे आहेत. त्यामुळे गेल्या काही वर्षात आंबोलीला वर्षा पर्यटनासाठी पर्यटकांची पहिली पसंती मिळत आहे. यंदा आंबोलीचा मुख्य धबधबा खूपच उशिरा जून महिन्याच्या शेवटी २९ जूनला प्रवाहित झाल्याने पर्यटकांचा हिरमोड झाला. तसेच व्यावसायिकांनाही फटका बसला. मात्र, परिसरात मागील २ दिवसापासून पावसाने लावलेल्या दमदार हजेरीने आंबोलीचा मुख्य धबधबा कोसळण्यास सुरूवात झाली आहे. परिणामी पर्यटकांची या ठिकाणी गर्दी होऊ लागली आहे.