सिंधुदुर्ग - गोव्यातून महाराष्ट्रात येताना आजपासून (25 एप्रिल) ई-पास अत्यावश्यक करण्यात आला आहे. ज्यांच्याकडे प्रवासाचा परवाना नसेल त्यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रवेश देण्यात येणार नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. बांदा येथील तपासणी नाक्यावर ई पासची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. चोरवाटांवर लक्ष ठेवण्यासाठी आजपासून पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यातून गोव्यात दररोज नोकरीसाठी ये-जा करणाऱ्या तरुणांना जिल्हा प्रवेश बंदीतून सवलत देताना १५ दिवसांचा पास देण्याचे आश्वासन जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी दिले आहे.
गोव्यात येण्या-जाण्यासाठी ई-पास आवश्यक-
गोव्यातून जिल्ह्यात येणाऱ्या वाहनचालकांचे ई-पास तपासण्यात येणार आहे. ई-पास नसल्यास त्या वाहनांना जिल्ह्याच्या हद्दीत प्रवेश नाकारण्यात येणार आहे. गोवा-सिंधुदुर्ग सीमेवर तसेच जिल्ह्यात येणाऱ्या अन्य रस्त्यांवर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
आजपासून अमंलबजावणी सुरु -
गोव्यातून येणाऱ्यांना ई-पास अत्यावश्यक केल्याने या आदेशाची अंमलबजावणी सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाने आजपासून केली. सिंधुदुर्ग-गोवा सीमेवर तत्काळ गोव्यातून येणाऱ्यांची रॅपिड तपासणी व ई-पासची तपासणी करण्यास सुरुवात करण्यात आली. याबाबतची कल्पना बांदा सरपंच अक्रम खान यांनी दिली.
नोकरदार युवकांना जिल्हा प्रशासनाकडून पंधरा दिवस ये-जा करण्यासाठी मिळणार पास -
यावेळी झालेल्या चर्चेत दाभाडे यांनी नोकरदार युवकांना जिल्हा प्रशासनाकडून पंधरा दिवस ये-जा करण्यासाठी पास देण्याचे कबूल केले आहे. त्यामुळे सावंतवाडी व बांदा परिसरातील युवकांनी बांदा सरपंच अक्रम खान, वेंगुर्ले तालुक्यातील तसेच सातार्डे परिसरातील युवकांनी भाजपचे तालुका उपाध्यक्ष शेखर गावकर यांचेकडे व दोडामार्ग तालुक्यातील युवकांनी माजी नगराध्यक्ष संतोष नानचे व चेतन चव्हाण यांच्याशी संपर्क साधून लवकरात लवकर नाव नोंदणी करण्याचे आवाहन राजन तेली यांनी केले आहे. या युवक-युवतीची नावे जिल्हा प्रशासनाला भाजपच्या वतीने कळविण्यात येणार असून त्यांच्या नावे पास जारी करण्यात येणार असल्याचे तेली यांनी सांगितले आहे.