सिंधुदुर्ग - रोग प्रतिकार शक्ती वाढवणाऱ्या अर्सेनिकम अल्बम-30 या होमिओपॅथिक गोळ्यांचे वाटप जिल्ह्यातील सव्वा दोन लाख कुटुंबाना करण्यात येणार आहे. या गोळ्यांच्या वाटपाचा आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.
यावेळी आमदार वैभव नाईक, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे आदी उपस्थित होते.
जिल्ह्यातील सर्व नागरिकांसह कोरोना लढ्यामध्ये आघाडीवर सेवा बजावणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांना या गोळ्यांचे वाटप करण्यात येणार आहे. त्यामध्ये आरोग्य अधिकारी, कर्मचारी, पोलीस, स्वच्छता कर्मचारी, महसूल अधिकारी व कर्मचारी यांना या गोळ्या दिल्या जाणार आहेत. या गोळ्या 12 वर्षांवरील सर्वांनी महिन्यातून 3 दिवस उपाशीपोटी तीन गोळ्या घ्यावयाच्या आहेत, तर बारा वर्षाच्या आतील मुलांनी 2 गोळ्या तीन दिवस या प्रमाणे तीन महिने घ्यावयाच्या आहेत. तसेच मधुमेह, उच्च रक्तदाब यासह इतर काही आजार असणाऱ्या रुग्णांनाही या गोळ्या घेता येणार आहेत. त्याचे कोणतेही वाईट परिणाम शरिरावर होत नाहीत.
यावेळी आमदार वैभव नाईक यांनी सध्या पावसाळा सुरू असून त्यामुळे तापाच्या रुग्णांची संख्या जिल्ह्यात वाढते, असे सांगितले. यासाठी जिल्हा आरोग्य यंत्रणेने ग्रामीण भागांमध्ये कॅम्पचे आयोजन करावे व तापाच्या रुग्णांची तपासणी करावी, अशा सूचना दिल्या. सध्या कोविडच्या पार्श्वभूमीवर लोक तापाचा आजार लपवतात, पावसामध्ये शेतीत काम करताना लोक भिजल्यामुळे त्यांना ताप येतो. पण ते त्याकडे दुर्लक्ष करतात. अशावेळी नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ नये यासाठी आरोग्य यंत्रणांनी अशा प्रकराचे कॅम्प घ्यावेत, असेही त्यांनी सांगितले.
सर्व शासकीय यंत्रणांनी प्रत्येक कुटुंबाला या गोळ्या पोहोचतील, असे नियोजन करावे व जनतेने आरोग्य यंत्रणेच्या सूचनेप्रमाणे या गोळ्यांचे सेवन करावे, असे आवाहन खासदार विनायक राऊत यांनी केले.