सिंधुदुर्ग - ज्ञाननिष्ठा वाढवायची असेल तर विज्ञानाचा फायदा सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचणे आवश्यक आहे. काजू बोंडापासून इथेनॉल निर्मिती हा त्याचाच एक भाग आहे. हा 'पायलट प्रोजेक्ट' जगातील पहिलाच प्रयोग ठरणार आहे. या प्रकल्पासाठी सकारात्मक दृष्टीकोन ठेवा आणि मदतीचा हात द्या, असे आवाहन मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष पद्मभूषण डॉ. जे. बी. जोशी यांनी केले. ते ओरस येथे आयोजित विशेष चर्चा सत्रात बोलत होते.
सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात काजूची लागवड आहे. या काजूपासून उत्पादित होणारे बोंड सद्यस्थितीत वाया जाते. काजू बोंडावरील प्रक्रिया उद्योग जिल्ह्यामध्ये नसल्याने जिल्ह्यातील बहुतांशी भागातील बोंड शेतकरी शेतातच फेकून देतात. या बोंडावर प्रक्रिया केल्यास शेतकऱ्यांना काजू बियांसोबतच बोंडापासूनही आर्थिक लाभ होऊ शकतो. दरम्यान, काजू बोंडावर प्रक्रिया केल्यास इथेनॉलची निर्मिती शक्य असल्याने राज्य शासनाने पायलट प्रोजेक्टसाठी पुढाकार घेत अभ्यास समिती नियुक्त केली आहे.
माणगांव येथील हेडगेवार प्रकल्प आणि सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचेही सहकार्य यात राहणार आहे. काजू बोंडापासून इथेनॉल निर्मिती अभ्यास समिती, हेडगेवार प्रकल्प आणि सिंधुदुर्ग जिल्हा बँक यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्गनगरीत जिल्हा बँकेच्या प्रधान कार्यालयात चर्चासत्र आयोजित करण्यात आले. यामध्ये प्रकल्पासंदर्भात सूचना, शंका- निरसन आणि विचारविनीमय झाले.
या चर्चासत्राला मराठी विज्ञान परिषदचे अध्यक्ष पद्मभूषण डॉ. जे. बी. जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती. तर, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, अभ्यास समिती अध्यक्ष अतुल काळसेकर, सदस्य तथा हेडगेवार प्रकल्प प्रमुख सुनील उकीडवे, सदस्य हरिष कांबळे, अखिल भारतीय विज्ञान परिषद कार्यकारिणी सदस्य अनिल केळकर, माजी आमदार अजित गोगटे, प्रमोद धुरी, प्रसाद देवधर, प्रभाकर सावंत तसेच सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यातील काजू उत्पादक शेतकरी आदी देखील उपस्थित होते.
केंद्र शासनाच्या इथेनॉल पॉलिसी नुसार जिल्ह्याच्या आर्थिक विकासात अमुलाग्र बदल घडविणारा हा प्रकल्प आहे. हा पथदर्शी प्रकल्प जगातील पहिलाच प्रयोग ठरणार आहे. या प्रकल्पासाठी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून प्रत्येकाने मदतीचा हात द्यावा, असे आवाहनही डॉ. जे. बी. जोशी यांनी शेवटी केले.