सिंधुदुर्ग - गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर आता भाजपा आक्रमक झाली असून आता परिवहन मंत्री अनिल परब यांना भाजपाने लक्ष केले आहे. आमदार नितेश राणे यांनी सिंधुदुर्गात बोलताना सचिन वाझे आणि अनिल परब यांचे संवाद एनआयकडे आहेत, असा गौप्यस्फोट केला आहे.
अनिल परब यांनी राजीनामा देऊन चौकशीला सामोरे जावे-
सचिन वाझे आणि अनिल परब यांचे संवाद आणि टेलिग्रामचे चॅट एनआयकडे असल्याचा गौप्यस्फोट भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केला आहे. यावेळी बोलताना नितेश राणे यांनी अनिल परब यांच्यावर जोरदार प्रहार करून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. जो नियम अजित पवार, अनिल देशमुख व अशोक चव्हाण यांना लागला तोच नियम अनिल परब यांना लागू होऊन त्यांनी राजीनामा देऊन चौकशीला सामोरे जाण्याची मागणी नितेश राणे यांनी केली आहे.
उदया तोंड काळ होण्यापेक्षा आजच राजीनामा दया-
नितेश राणे पुढे म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी विचारलं होत की गृहखाते अनिल देशमुख चालवतात की अनिल परब, यावर काल शिक्कामोर्तब झाला आहे. वकील असलेल्या माणसाने अशा प्रकारच्या शपथा खायच्या असतात का?, तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही राजीनामा देऊन चौकशीला सामोरे जायला हवं. जो नियम अनिल देशमुखांना लागतो. जो नियम सिंचन घोटाळ्याच्यावेळी अजित पवारांना लागला. जो नियम आदर्श घोटाळ्याच्यावेळी अशोक चव्हाणांना लागू होतो, तोच अनिल परबांना लागतो. तेव्हा त्यांनी शपथा खाल्ल्या नाहीत ते चौकशीला सामोरे गेले. लहान शेम्बड्या मुलांसारख्या शपथा खाऊ नयेत. सचिन वाझे आणि अनिल परब यांच्यामधले संवाद हे एनआयकडे आहेत. टेलिग्रामचे चॅट पण त्यांच्याकडे आहेत. उदया तोंड काळ होण्यापेक्षा आजच राजीनामा दया आणि चौकशीला सामोरं जा, असेही ते म्हणाले.
हेही वाचा- संभाजी भिडे म्हणाले- कोरोना अस्तित्वात नाही, जगायचे ते जगतील, मरायचे ते मरतील