पणजी - गोवा विधानसभा निवडणूक आता काही दिवसांवर येऊन ठेपली आहे प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे. सर्वच पक्षांनी शेवटच्या टप्प्यात प्रचार करण्यासाठी जोरदार प्रयत्न चालवले आहेत. मात्र, निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिलेले अनेक उमेदवार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असल्याने मतदारांमध्ये काहीशी नाराजी आहे. विशेष म्हणजे गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदाच्या विधानसभेसाठी उभे राहिलेल्या उमेदवारांमध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले उमेदवार अधिक आहेत.
गोव्यात ४० विधानसभा मतदारसंघांसाठी उभ्या असलेल्या ३०१ उमेदवारांपैकी ७७ उमेदवार म्हणजे २६ टक्के उमेदवार हे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. हे प्रमाण गेल्या विधानसभा निवडणुकीपेक्षा वाढले असून गेल्या विधानसभा निवडणुकीत २५१ उमेदवारांपैकी ३८ उमेदवार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे म्हणजेच १५ टक्के उमेदवार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे होते. या पैकी १८ टक्के म्हणजे ५३ उमेदवार गंभीर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत हे प्रमाण आठ टक्के म्हणजे १९ उमेदवार गंभीर गुन्हेगारी पार्श्वभूमीचे होते.
पक्षनिहाय गुन्हेगारी पार्श्वभूमीचे उमेदवार
गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांचे पक्षनिहाय प्रमाण पाहिल्यास काँग्रेसचे सर्वाधिक १७ म्हणजे ४६ टक्के उमेदवार आहेत. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे ही १३ पैकी सहा उमेदवार म्हणजेच ४६ टक्के आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या १३ उमेदवारांपैकी चार उमेदवार म्हणजे ३१ टक्के गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. भाजपचे ४० पैकी १० म्हणजेच २५ टक्के उमेदवार आहेत. तुम्ही काँग्रेसचे २६ उमेदवारांपैकी सहा उमेदवार तर आजचे ३९ पैकी ९ उमेदवार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत.
गंभीर गुन्हे असलेले पक्षनिहाय उमेदवार
काँग्रेसच्या ३७ उमेदवारांपैकी तेरा उमेदवारांवर गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या तेरा उमेदवारांपैकी तीन उमेदवारांवर गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. भाजपच्या ४० उमेदवारांपैकी ७ उमेदवारांवर गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या तेरा उमेदवारांपैकी दोन उमेदवार गंभीर गुन्ह्यांमध्ये अडकलेले आहेत तृणमूल काँग्रेसच्या २६ उमेदवारांपैकी चार उमेदवारांवर आणि आपच्या ३९ उमेदवारांपैकी चार उमेदवारांवर गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे.
सर्वपक्षीय उमेदवारांमध्ये बारा उमेदवारांवर महिलांशी संबंधित गुन्ह्यांची नोंद आहे. तर खूनाचा प्रयत्न केल्याचा ठपका आठ उमेदवारांवर आहे. ४० मतदारसंघांपैकी तीस टक्के म्हणजे १२ मतदार संघ हे संवेदनशील मतदारसंघ म्हणून जाहीर करण्यात आले आहेत.
मतदारांनी विचार करावा
दरम्यान, गोव्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांबाबत बोलताना मतदारांनी नाराजी व्यक्त केली आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना मतदान करताना हे उमेदवार आमदार झाल्यानंतर आपले किती संरक्षण करतील आणि कशा पद्धतीचे वर्तन असेल याबाबत मतदारांनी सजग राहून विचार करावा, असे मत राजन नाईक यांनी व्यक्त केले आहे. तर सर्वच पक्षात कमीअधिक प्रमाणात गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक असतात त्यामुळे उमेदवारांवर गुन्हे दाखल असण्याची ही पहिली वेळ नाही, मात्र यातून जे उमेदवार जनतेसाठी हिताची कामे करू शकतील, अशा उमेदवारांनाच जनतेने प्राधान्य द्यावे, असे मत संजय पेडणेकर यांनी व्यक्त केले आहे.