सिंधुदुर्ग - महाराष्ट्रात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कडक लॉकडाऊन सुरू आहे. असे असताना देखील भारताचा युवा क्रिकेटपटू पृथ्वी शॉ विना ई-पास मुंबईहून कोल्हापूर मार्गे गोव्याला जाण्याचा प्रयत्न करत होता. मात्र आंबोली पोलिसांनी त्याच्याकडे ई-पास ची विचारणा केली असता पृथ्वी शॉ जवळ कोणत्याही प्रकारचा पास नसल्याने पृथ्वीचा चांगलाच गोंधळ उडाला. अखेर त्याने ई-पास काढून पोलिसांना दाखवल्यानंतरच त्याला सोडण्यात आले.
पृथ्वी शॉ ला एक तास आंबोलीमध्ये थांबून राहावे लागले -
ई-पास असल्याशिवाय पुढे जाता येणार नाही, असे पोलिसांनी त्याला खडसावून सांगितले. त्यानंतर लगेच ऑनलाईन पास काढून पृथ्वी गोव्याकडे रवाना झाला. यात विचार करण्याची बाब अशी की, मुंबईहून प्रवास करताना पृथ्वीला कुठेही पास विचारण्यात आला नाही. मात्र, महाराष्ट्रातील आंबोली पोलिसांच्या जागरूकतेमुळे क्रिकेटपटू पृथ्वी शॉ ला एक तास आंबोलीमध्ये थांबून राहावे लागले.
अखेर ई-पास काढूनच त्याला गोवा गाठावे लागले -
पृथ्वीची गाडी आंबोली पोलीस नाक्याजवळ आली होती. तेव्हाच आरोग्य विभागाने त्यांची आरोग्य तपासणी केली. त्यानंतर पोलिसांनी त्याला तपासणीसाठी ई पास मागितला तेव्हा मात्र त्याच्या जवळ कोणत्याही प्रकारचा पास नसल्याचे त्याने सांगितले आणि तिथेच त्याचा गोंधळ उडाला. दरम्यान ही घटना बुधवारची असल्याचे समोर आले आहे. आंबोली पोलिसांनी पास शिवाय त्याला जाता येणार नाही, असे सांगत त्याला तपासणी नाक्याजवळच थांबवले. तेव्हाच पृथ्वी शॉ ने आंबोलीतूनच ऑनलाईन ई पाससाठी अर्ज केला. पूर्ण एक तासानंतर त्याचा ई-पास तयार होऊन त्याची कॉपी मोबाईलवर आल्यावर त्याला आंबोली पोलीसांनी जाण्याची परवानगी दिली. तेव्हा तो वेळेवर काढलेला इ-पास आंबोली पोलिसांना दाखवून पृथ्वी शॉ गोव्याकडे मार्गस्थ झाला.