सिंधुदुर्ग - कोरोनामुळे सुरू असलेल्या लाॅकडाऊनमुळे आंबोलीतील पर्यटन व्यावसायिक चिंतेत आहेत. आंबोली हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण आहे. वर्षाचे बाराही महिने या ठिकाणी पर्यटकांची वरदळ असते. सध्या इकडे कोणीच फिरकत नसल्याने पर्यटनावर अवलंबून असलेले हे स्थळ शांत दिसत आहे.
आंबोलीत वर्षभर जवळपास आठ ते नऊ लाख पर्यटक पर्यटनाचा आंनद लुटण्यासाठी येत असतात. सध्या असलेल्या लाॅकडाऊनमुळे येथील उन्हाळी पर्यटन पूर्णतः वाया गेला आहे. आता वर्षा पर्यटनावरही कोरोनाचा परिणाम होण्याची भीती येथील पर्यटन व्यावसायिकांना वाटते आहे. गेल्यावर्षीचा आंबोली मधील वर्षा पर्यटन अतीवृष्टीमुळे वाया गेला. आता याही वर्षी कोरोनामुळे वर्षा पर्यटन वाया गेल्यास खायचं काय असा प्रश्न व्यावसायिकांना पडला आहे.