सिंधुदुर्ग - आमदार नितेश राणे आणि त्यांचा खासगी सचिव राकेश परब यांच्या जामीन अर्जावर मंगळवारी दोन्ही पक्षाच्या वकिलांनी युक्तिवाद पूर्ण केला आहे. मात्र, याबाबतचा निर्णय न्यायालयाने बुधवारपर्यंत राखून ठेवला आहे. बुधवारी दुपारी यासंदर्भात निर्णय दिला जाईल, असे न्यायालयाने स्पष्ट केल्याचे सरकारी वकील प्रदीप घरत यांनी सांगितले आहे.
- नितेश राणे आणि आतापर्यंतची न्यायालयीन प्रक्रिया -
आमदार नितेश राणे आणि राकेश परब यांना शुक्रवारी न्यायालयीन कोठडी झाल्यानंतर त्यांचे वकील संग्राम देसाई यांनी तत्काळ जिल्हा न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने अर्ज दाखल करून घेतल्यानंतर वकील संग्राम देसाई यांनी आपली बाजू मांडली होती. त्यावर न्यायालयाने शनिवारी दुपारी यावर सुनावणी घेऊन निर्णय देण्यात येईल, असे सांगितले होते. त्यानुसार आमदार राणेंचे वकील सतीश मानेशिंदे, संग्राम देसाई शनिवारी दुपारी न्यायालयात हजर झाले होते. परंतु या प्रकरणी शासनाने नियुक्त केलेले विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी ई-मेलद्वारे अर्ज करीत बचाव पक्षाच्यावतीने अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या न्यायालयात जो अर्ज दाखल केलेला आहे, त्या अर्जावर या न्यायालयात ही सुनावणी न घेता प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयात घेण्याची मागणी केली होती. परंतु, सरकारी वकील घरत यांनी केलेल्या अर्जावर स्वाक्षरी नव्हती. तो विहित नमुन्यात नव्हता. त्यामुळे हा अर्ज फेटाळण्याची मागणी आ. राणे यांच्या वकिलांनी केली. त्यानंतर सायंकाळी 4 वाजेपर्यंत अर्ज परिपूर्ण करण्यास मुदत देण्यात आली होती. तरीही वकील घरत यांनी त्रुटी दूर केल्या नाहीत. त्यानंतर हा अर्ज प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयात देण्यात आला. यावेळी या न्यायालयाने जामीन अर्जावर सोमवारी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी होईल. तसेच विशेष सरकारी वकिलांनी दिलेल्या अर्जातील त्रुटी दूर करण्यास सोमवारी दुपारी 2 वाजेपर्यंत वेळ दिला होता. दरम्यान गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे रविवारी निधन झाले. या पार्श्वभूमीवर राज्यात दुखवटा जाहीर करण्यात आला. सोमवारी सार्वजनिक सुट्टी राज्य सरकारने जाहीर केली. त्यामुळे ही सुनावणी मंगळवारी घेण्यात आली.
- दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण -
दोन्ही पक्षाच्या वकिलांनी या वेळी युक्तिवाद केला. सरकारी पक्षाकडून आमदार नितेश राणे यांना जामीन देऊ नये असे सांगतानाच याप्रकरणी अद्यापही दोन आरोपी फरार आहेत. तसेच नितेश राणे यांना जामीन दिल्यास त्यांचा लोकसंपर्क आणि लोकसंग्रह मोठा असल्याने साक्षीदारांवर दबाव येऊ शकतो, अशा पद्धतीचे युक्तिवाद सरकारी पक्षाच्या वतीने करण्यात आला. दरम्यान याबाबत बुधवारी निकाल दिला जाईल असे न्यायालयाने स्पष्ट केले. संतोष परब यांच्यावर खुनी हल्ला करणार्या मारेकर्यांना दीड लाखांची सुपारी देण्यात आली होती. असाही मुद्दा सरकारी वकिलांनी मांडला
- नितेश राणे यांचे वकील म्हणाले -
या मुद्द्याला नितेश राणे यांच्या वकिलांनी आक्षेप घेतला. याबाबत माध्यमांशी बोलताना राणे यांचे वकील संग्राम देसाई म्हणाले की, असा कोणताही पुरावा सरकारी पक्षाच्यावतीने अद्यापही सादर करण्यात आलेला नाही. दोन फरारी असलेल्या आरोपींसोबत नितेश राणे यांचा काहीही संबंध नाही. धीरज परब आणि ज्ञानेश्वर माउली असे हे दोन आरोपी आहेत. त्यांना पोलिसांना अटक करायची तेव्हा करू द्या, परंतु नितेश राणे यांच्यासोबत यांचा काही संबंध नाही. असेही नितेश राणे यांचे वकील सतीश मानेशिंदे यांनी सांगितले.
- काय आहे प्रकरण?
जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे समर्थक व करंजे गावचे माजी सरपंच संतोष परब यांच्यावर 18 डिसेंबर 2021 रोजी अज्ञात इनोव्हा कारमधून आलेल्या दोघांनी टोकदार चाकूने वार केल्याने परब जखमी झाले होते. संतोष परब यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा हल्ला राजकीय वादातून केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. जिल्हा बँक निवडणूक सुरू असतानाच झालेल्या या हल्ल्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली होती. संतोष परब हे मोटरसायकलवरून कनकनगर येथे जात असताना मागून येणाऱ्या नंबर प्लेट नसलेल्या इनोव्हा कारने परब यांच्या मोटरसायकलला डॉ. नागवेकर यांच्या एम. आर. आय. सेंटर नजीक मागून धडक दिली. धडकेनंतर परब रस्त्यावर पडल्यानंतर इनोव्हा कारमधून आलेल्या दोघांनी परब यांच्यावर चाकू सदृश्य टोकदार हत्याराने छातीवर वार केले.
- आमदार नितेश राणे रुग्णालयात भरती -
आमदार नितेश राणे (Nitesh Rane Admitted at CPR) यांना उपचारासाठी कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयामधील (CPR Hospital) तुळशी इमारतीमध्ये अॅडमिट केले आहे. सीपीआर रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी गिरीश कांबळे यांनी याबाबत माहिती दिली आहे. राणे यांच्यावर उपचार करण्यासाठी सीपीआर रुग्णालयामधील तज्ज्ञ डॉक्टरांची एक टीम तयार केली आहे. त्यामध्ये सर्व प्रकारच्या वैद्यकीय अधिकार्यांचा समावेश आहे. विशेषतः हृदयरोग, अस्थिरोग तज्ज्ञ यांचाही समावेश यात केलेला आहे. सर्व तपासण्या करण्याचे काम झालेल्या असून त्यांचे रिपोर्ट येणे बाकी आहे. सीपीआर रुग्णालय प्रशासनाने दक्षता घेतली असून, कोल्हापूर पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात केला आहे.