सिंधुदुर्ग - जिल्हा रुग्णालयाच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल असलेल्या रुग्णांमधील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. मात्र, त्या रुग्णाचा कोरोना नमुना तपासणी अहवाल निगेटिव्ह आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली.
जिल्हा रुग्णालयाच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये सध्या 52 रुग्ण उपचाराखाली असून यातील एका रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर आरोग्य यंत्रणेची धावपळ उडाली. त्या रुग्णाच्या मृत्यूपूर्वी स्वॅबचा नमुना घेऊन तपासणीसाठी मिरज येथे पाठविण्यात आला होता. या रुग्णाचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. आयसोलेशनमध्ये दाखल होतानाच या रुग्णाची प्रकृती गंभीर होती. दुसऱ्याच दिवशी त्याचा मृत्यू झाला. या रुग्णाचा सर्दी, खोकला, ताप किंवा अन्य आजारामुळे मृत्यू झाला असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
जिल्हा रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डमध्ये 52 व्यक्ती दाखल असून कोरोना तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या एकूण नमुन्यांमधून आणखी दोघांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. नव्याने आणखी 10 जणांचे नमुने कोरोना तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. आजपर्यंत 154 नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून 106 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. त्यामध्ये एकमेव पॉझिटिव्ह रुग्ण वगळता उर्वरित सर्व 105 नमुन्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. पॉझिटिव्ह आलेला रुग्ण सुद्धा आता कोरोना मुक्त झालेला आहे. अजूनही 48 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झालेला नाही. जिल्हय़ात आजमितीस 390 व्यक्तींना घरीच अलगीकरण करण्यात आले असून 52 व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात आहेत. 28 दिवसांचा अलगीकरणाचा कालावधी पूर्ण केलेल्या व्यक्तींची संख्या 213 आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या पथकातर्फे जिल्हय़ातील सात वृद्धाश्रमांची तपासणी करण्यात आली. यात एकूण 372 रुग्णांची तपासणी करून त्यांचे समुपदेशन करण्यात आले. आश्रमातील वृद्धांची रक्तदाब, मधुमेह तपासणी करून दोन महिन्यांच्या औषधांचा पुरवठा करण्यात आला. जिल्हय़ातील सहा निवारा केंद्रांचीही तपासणी या पथकामार्फत करण्यात आली. त्यामध्ये 101 व्यक्तींची तपासणी करून त्यांचे समुपदेशन करण्यात आले.
जिल्ह्यातील ओरोस व सावंतवाडी येथील कारागृहातील कैद्यांची तपासणीही करण्यात आली. ओरोस येथील 66 कैद्यांची तपासणी करण्यात आली. त्यातील 10 कैद्यांना असलेल्या किरकोळ आजारांवर औषधोपचार करण्यात आले. सावंतवाडी येथील कारागृहातील 60 कैद्यांची तपासणी करून त्यापैकी किरकोळ आजार असलेल्या 17 कैद्यांवर औषधोपचार करण्यात आले. लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये सध्या जिल्हा रुग्णालयामार्फत डायलेसीसचे सात व केमोथेरपीचा एक रुग्ण सेवा घेत आहे. आरोग्य यंत्रणेमार्फत शुक्रवारी 2119 व्यक्तींची तपासणी करण्यात आली. अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.