सिंधुदुर्ग - राज्यभरात कोरोनाने अक्षरशः धुमाकूळ घातलेला असताना मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये कोविड रुग्णांना उपचारासाठी बेड मिळत नाही. अशा स्थितीत माझ्या गावात कणकवली नगरपंचायतने कोविड रुग्णांची काळजी घेण्यासाठी चांगल्या दर्जाची सुविधा निर्माण केल्याचे मला समजले. "ह्या माझाच गाव, माका समाजला आणि मी इलय" अशा अस्सल मालवणीत हास्यसम्राट अभिनेते भाऊ कदम यांनी दाद देताना कणकवलीत नगरपंचायतीच्या कोविड केअर सेंटरमधील रुग्णांशी संवाद साधला.
रुग्णांशी साधला मालवणी भाषेत संवाद -
कणकवली नगरपंचायतच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या मुडेश्वर मैदान येथील कोविड केअर सेंटर व भगवती मंगल कार्यालय येथे होत असलेल्या १०० बेडच्या विलगीकरण केंद्राचीहि पाहणी कॉमेडीकिंग भाऊ कदम यांनी केली. यावेळी भाऊ कदम यांनी जिल्ह्यात नावाजलेल्या या कोविड केअर सेंटरबद्दल बोलताना सांगितले, की खरोखरच सुंदर नियोजनबद्ध सुविधा येथे देण्यात येत आहेत. यावेळी त्यांच्यासोबत नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, मुख्याधिकारी अवधूत तावडे, नगरसेवक रवींद्र गायकवाड, अॅड. विराज भोसले, गटनेते संजय कामतेकर, मेघा गांगण, कविता राणे, प्रतीक्षा सावंत, महेश सावंत, किशोर राणे, सिद्धेश महाजन, बंडू गांगण, राजू गवाणकर आदी उपस्थित होते.
कोविड केअर सेंटर उभारायचे असल्यास मी मदत करायला तयार -
कणकवली नगरपंचायतच्या कोविड केअर सेंटरची पाहणी व कणकवली नगरपंचायतच्या वतीने सुरु करण्यात येणाऱ्या विलगीकरण केंद्राच्या पाहणीनंतर कॉमेडीकिंग भाऊ कदम यांनी कणकवली नगरपंचायतच्या कामाचे कौतुक केले. नगरपंचायतीने कोरोना रुग्णांची काळजी घेण्यासाठी खरोखरच नियोजनबद्ध उपाययोजना केल्या आहेत. अगदी येथे दाखल झालेल्या रुग्णांना आपल्या नातेवाईकांशी देखील संपर्क साधण्यासाठी सुविधा दिली. मनोरंजनाची साधने उपलब्ध केली. नगरपंचायतची हे कोविड सेंटर अनेकांसाठी आदर्शवत अशी आहेत, असे गौरवोद्गार भाऊ कदम यांनी काढले. कणकवली नगरपंचायतला अजून कोविड सेंटर जर उभारायचे असेल व माझी मदत लागली तर त्यांना मदत करण्यास मी तयार आहे अशी ग्वाही देखील कदम यांनी याप्रसंगी दिली.