सिंधुदुर्ग - दोडामार्ग तालुक्यातील धामणा धरणाला मोठ्या प्रमाणात गळती लागलेली आहे. गेल्या तीन ते चार वर्षांपासून धरणाची ही दुरावस्था झाली आहे. हे धरण जलसंपदा विभागाच्या अखत्यारीत येते. मात्र, सिंधुदुर्ग जलसंपदा विभाग याकडे दुर्लक्ष करत आहे.
धामणा धरणाच्या बांधकामाला ४० वर्षे झाले आहेत. मात्र, मागील काही वर्षांपासून या धरणाची डागडुजी झाली नसल्याचा नागरिकांचा आरोप आहे. विशेष म्हणजे ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे धामणा धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. मात्र, त्याला मोठ्या प्रमाणात गळती लागलेली असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यासह गोव्यातील डिचोली, पेडणे तालुक्यांनाही याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. यामुळे या गंभीर समस्येकडे वेळीच लक्ष दिले नाही, तर दोडामार्ग सह गोव्यातील हजारो नागरिकांच्या जीवितास पुरामुळे धोका उत्पन्न होऊ शकतो. अशी भीती स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.
जलसंपदा विभागाने धामणा धरणाकडे वेळीच लक्ष देऊन या ठिकाणची पाणी गळती थांबवावी. अशी स्थानिक ग्रामस्थांची मागणी आहे. दरम्यान, गोव्यातील नागरिक देखील धामणा धरणाच्या सद्यस्थिती बद्दल आपल्या सरकारचे लक्ष वेधणार आहेत. अशी माहिती आहे.