सिंधुदुर्ग - पूजा चव्हाण या मुलीने केलेली आत्महत्या ही तिची हत्याच आहे. त्यामुळे तिच्या आत्महत्येला जबाबदार असलेले मंत्री संजय राठोड यांना बेड्या ठोका, अशी मागणी करताना महाराष्ट्राचे गृहमंत्री बलात्काऱ्यांना क्लिनचीट देतायेत म्हणून राज्यात महिलांवर अत्याचार करण्याची प्रवृत्ती वाढत आहे, असा आरोप भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केला आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पूजाला न्याय देतील
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात शिवसेनेचे नेते आणि मंत्री संजय राठोड यांचं नाव पुढे आल्यापासून भाजप आक्रमक झाली. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात संजय राठोड यांच्याविरोधात सबळ पुरावे असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री कसली वाट बघतायेत, त्यांच्या मुसक्या आवळा, असं म्हणत त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केली. तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री संवेदनशील आहेत. ते पूजाला न्याय देतील, असेही त्या म्हणाल्या.
महाराष्ट्र पोलीस संजय राठोड यांचा का शोध घेऊ शकत नाहीत
पूजा चव्हाणची आत्महत्येची घटना समोर आल्यानंतर दोन दिवसात ज्या काही अपडेट येत आहेत ते व्हायरल होत आहे. काही ऑडिओ क्लिप सोशल मीडियाद्वारे समोर येत आहेत. त्या सर्व क्लिप धक्कादायक आहेत. या सगळ्या गोष्टींचा रोख मंत्री संजय राठोड यांच्याकडे आहे. एवढे पुरावे असताना तुम्ही आता वाट कुणाची बघत आहात? अशा लोकांच्या मुसक्या आवळायलाच हव्यात, असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्र पोलीस संजय राठोड यांचा का शोध घेऊ शकत नाहीत असा प्रश्नही त्यांनी केला आहे.
राज्यात महिला असुरक्षित आहेत
यावेळी चित्रा वाघ म्हणाल्या, राज्यात महिला असुरक्षित आहेत. मंत्र्यांकडूनच महिलांवर बलात्कार होत आहेत. राज्यात गृहमंत्री बलात्काऱ्यांना क्लिनचीट देता आहेत. आजवरच्या अनेक घटनांमध्ये असे घडले आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे.
रेणू शर्मावरून भाजपच्या भूमिकेकडे चुकीच्या पद्धतीने पाहू नये
रेणू शर्मा प्रकरणात तिच्यावर अन्याय झाला असेल तर संबधित मंत्र्यांवर कारवाई झाली पाहिजे अशी आमची भूमिका होती. मात्र तिने आपली तक्रार मागे घेतली तेव्हा तिच्यावर कारवाई करा अशीही आम्ही मागणी केली. त्यामुळे हिम्मत असेल तर करा तिच्यावर कारवाई असेही त्या म्हणाल्या. तर रेणू शर्मावरून भाजपच्या भूमिकेकडे चुकीच्या पद्धतीने पाहू नये असेही त्यांनी स्पष्ट केले.