सिंधुदुर्ग - नारायण राणे यांनी आज दिल्लीत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडून केंद्रीय मंत्री पदाची शपथ घेतली. यानंतर सिंधुदुर्गात त्यांच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. साडेसहा वर्षांनंतर राणे पुन्हा एकदा सत्तेच्या केंद्रस्थानी आलेले आहेत, त्यामुळे कार्यकर्त्यांमध्येही उत्साह आहे. जिल्ह्यात कार्यकर्त्यांनी लाडू-पेढे वाटून आणि फटाक्यांची आतषबाजी करत आपला आनंद साजरा केला.
हेही वाचा - ...आणि उद्धव ठाकरे विरुद्ध राणे असा संघर्ष सुरू झाला
राणे साडेसहा वर्ष सत्तेच्या पदापासून दूर होते
सिंधुदुर्ग हा नारायण राणे यांचा बालेकिल्ला. याच ठिकाणी त्यांच्या राजकीय वाटचालीला खऱ्या अर्थाने गती मिळाली. गेली तब्ब्ल साडेसहा वर्ष सत्तेच्या पदापासून दूर असलेल्या नारायण राणे यांची केंद्रीय मंत्री म्हणून वर्णी लागली आणि सिंधुदुर्गातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला. शिवसेनेपासून काँग्रेस आणि स्वाभिमानी पक्ष, असा प्रवास करून आता भाजपात स्थिरावलेले माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे यांची केंद्रात मंत्रिपदावर वर्णी लागली आहे. त्यामुळे, येत्या काळात शिवसेनेला कोंडीत पकडण्यासाठी नारायणस्त्राचा वापर भाजप करणार, हे मात्र नक्की.
अमित शहा यांनी पाळला शब्द
काही महिन्यांपूर्वीच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नारायण राणे यांच्या मेडिकल कॉलेजच्या उद्घाटना प्रसंगी बोलताना म्हंटले होते की, नारायण राणे यांचा योग्य तो भाजप पक्षामध्ये सन्मान केला जाईल. त्यामुळे, अमित शहा यांनी अखेर राणेंना दिलेला आपला शब्द पाळला आहे. त्यामुळे, कोकणात भाजप पक्ष येत्या काळात मजबूत होणार आहे.
नारायण राणेंच्या आजोळीही आनंदोत्सव
दरम्यान राणेंच्या शपथविधीनंतर कणकवली शहर भाजपच्या वतीने फटाके फोडत, पेढे, लाडू एकमेकांना भरवत तोंड गोड करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. कणकवलीत टू व्हीलर रॅली काढण्यात आली. कणकवली तालुक्यातील नांदगाव वाघाची वाडी येथील पाटील यांचे कुटुंबीय हे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे आजोळ. राणेंच्या नांदगाव येथील आजोळी जोरदार जल्लोष करण्यात आला आहे.
हेही वाचा - सिंधुदुर्गात १० विद्यार्थीसंख्या असणाऱ्या ४८६ शाळा होणार बंद