सिंधुदुर्ग - चवीला सर्वोत्कृष्ट, इतर काजूपेक्षा प्रोटीन, व्हिटॅमिन बी,सी यांचे अधिक प्रमाण, पोटॅशियम, मॅग्नेशियमचे चांगले प्रमाण, असे सर्व गुणधर्म असलेला जिल्ह्यातील काजू गर सध्या जागतिक बाजारपेठेत गटांगळ्या खात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील काजू बागायतदार हवालदिल झाले आहेत. जगभरातील अनेक देशांमध्ये काजूचे उत्पादन घेतले जाते. यामध्ये प्रामुख्याने ब्राझील, व्हिएतनाम, आफ्रिका, इंडोनेशिया या देशांचा समावेश आहे.
भारतात महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, गोवा, केरळ, कर्नाटक, ओडिशा, गुजरात, तमिळनाडू या राज्यांमध्ये काजूचे उत्पादन घेतले जाते. असे असले तरी देशात सर्वाधिक काजूचे उत्पादन महाराष्ट्रात घेतले जाते. राज्यात सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगडचा काही भाग, कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा, चंदगड अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात काजू लागवडीखाली आहे.
काजूचे उत्पादन सर्वत्र घेतले जात असले तरी कोकणातील काजूमध्ये विशिष्ट प्रकारचे गुणधर्म आढळतात. किनारपट्टीच्या या जिल्ह्यातील काजूला उत्तम दर्जाची चव तर आहेच; परंतु त्यामध्ये शरीराला आवश्यक असलेल्या प्रोटीन, व्हीटॅमिन बी, सी, आणि के यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. याशिवाय पोटॅशिअम, मॅग्नेशिअमचे प्रमाणही आहे. त्यामुळे कोकणातील काजूची तुलना इतर ठिकाणच्या काजूशी होऊ शकत नाही; परंतु असे असले तरी आपला दर्जेदार काजू सध्या कवडीमोल भावाने विकला जात आहे. त्याला कारणंही तशीच आहेत.कणकवलीत कृषी तज्ञ शिवाजी खरात सांगतात, आपल्या काजूतील गुणवैशिष्टे पोहोचवण्यात येथील बागायतदार आणि काजू तज्ज्ञांना यश आलेले नाही. नियमित वापरण्यात येणारा बदाम आणि म्हांबरा बदाम यामध्ये वर्गीकरण केले आहे. म्हांबरा बदाममध्ये वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म असल्याचे पटवून दिले आहे. त्यामुळे नियमित बदाम 700 ते 800 रुपये आणि म्हांबरा बदाम 2 हजार 800 ते 3 हजार 200 रुपयांना किलो विकला जातो. तशाच पद्धतीने आता कोकणातील काजू आणि इतरील काजू यातील फरक सिद्ध करून कोकणातील काजूचे स्वतंत्र ब्रॅंडींग होण्याची गरज आहे. काजूच्या स्वतंत्र ब्रॅंडींगसाठी कोकणातील बागायतदार, काजूशी निगडीत घटक आणि राजकीय पक्षांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. काजूच्या दरात घसरण झाली तर जिल्ह्याच्या अर्थकारणावर परिणाम होतो. त्यामुळे आपआपसांतील राजकीय हेवेदावे बाजूला ठेवून जिल्ह्यातील काजूच्या ब्रॅंडींगसाठी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे शिवाजी खरात म्हणाले.