सिंधुदुर्ग - जिल्ह्यात वाढता कोरोना प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हा रेड झोनमध्ये आला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या सर्व सीमा प्रशासनाने बंद केल्या आहेत. एखाद्या कुटुंबातील व्यक्तीचा मृत्यू झाला असेल किंवा आजारी असल्यास जिल्ह्यात येण्यासाठी ई-पास बंधनकारक करण्यात आले आहे. जिल्ह्याच्या खारेपाटण, करूळ, आंबोली, बांदा या जिल्ह्यातील सीमा आजपासून (मंगळवार) बंद करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. दरम्यान बांदा टोल नाका आणि खारेपाटण पोलीस चेकपोष्ट येथे आरोग्य पथक तैनात करण्यात आले आहे.
...म्हणून प्रशासनाने घेतला निर्णय
महाराष्ट्रात सर्वांत जास्त कोरोना रुग्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात असून राज्याचा सरासरी रुग्णसंख्या दर ०.४७ टक्के असताना सिंधुदुर्ग जिल्ह्याचा रुग्णसंख्या दर २.०१ टक्के आहे. जिल्हा सध्या रेडझोनमध्ये असून, रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गेल्या आठवड्यात जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्हिटी रेट राज्यात सर्वाधिक ३१.३६ टक्के इतका होता. त्यामुळेच जिल्हा रेडझोनमध्ये दाखल झाला असून, जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा दर दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्याच्या महामार्गावर बांदा टोल नाका आणि खारेपाटण पोलीस चेकपोष्ट येथे आरोग्य पथक तैनात करण्यात आले असून ज्याच्याकडे ई-पास आहे, त्यांची तपासणी करूनच त्यांना जिल्ह्यात प्रवेश दिला जात आहे.
'या' व्यक्तींना जिल्ह्यात प्रवेश नाही
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाने खारेपाटण, करूळ, आंबोली, बांदा या जिल्ह्यातील सीमा आजपासून (मंगळवार) बंद करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. यापूर्वी जिल्ह्याबाहेरून किंवा परराज्यातून येणाऱ्या व्यक्तींना जिल्ह्यात प्रवेश दिला जात होता. मात्र वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या सर्व सीमा पूर्णतः बंद करण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यात येण्यासाठी ई-पास बंधनकारक
मुख्यत्वे: एखाद्या कुटुंबातील व्यक्तीचा मृत्यू झाला असेल किंवा आजारी असल्यास जिल्ह्यात येण्यासाठी ई-पास बंधनकारक करण्यात आले आहे. १ जून ते १५ जूनपर्यंत हा निर्णय संपूर्ण जिल्ह्यात लागू असणार आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लोकांनी घराबाहेर पडू नये, दोन व्यक्तींमध्ये सुरक्षित अंतर ठेवावे, असे स्पष्ट निर्देश प्रशासनाने वारंवार करूनही लोक गंभीर्याने घेताना दिसत नाहीत.
हेही वाचा -जळगाव : देवेंद्र फडणवीसांच्या दौऱ्यात शेतकऱ्याचा विष घेत आत्महत्येचा प्रयत्न