सिंधुदुर्ग - अधिकारी आणि ठेकेदारांत साटेलोटे असल्याने कणकवली तालुक्यातील नरडवे धरणाचे काम गेल्या 19 वर्षांपासून रखडले आहे. या धरणाचा खर्च तब्बल 1 हजार 84 कोटींवर गेला आहे. त्यामुळे या धरण प्रकल्पाची संपूर्ण चौकशी व्हावी आणि दोषी अधिकारी व ठेकेदारांवर कारवाई व्हावी, अशी मागणी भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केली आहे. यासाठी राज्यपालांसह, मुख्यमंत्री आणि जलसंपदा मंत्र्यांना विनंती करणार असल्याचे तेली यांनी सांगितले.
तेली यांनी आज कणकवलीत पत्रकार परिषद घेतली. नरडवे धरण प्रकल्पामुळे कणकवली आणि कुडाळ तालुक्यातील 13 हजार 22 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. हे धरण पूर्ण होण्यासाठी येथील प्रकल्पग्रस्तांनी शासनाला वेळोवेळी सहकार्य केले. मात्र, अधिकार्यांच्या कामचुकारपणामुळे तीन गावांतील प्रकल्पग्रस्तांचे अजूनही पुनर्वसन झालेले नाही. तर ठेकेदाराच्या वेळकाढूपणामुळे या प्रकल्पाचा खर्च 32 कोटी रुपयांवरून 1 हजार 84 कोटींवर गेला आहे, अशी माहिती तेली यांनी दिली.
आत्तापर्यंत या धरणाच्या कामावर 520 कोटी रुपयांचा खर्च झाल आहे. मात्र, झालेले काम अतिशय निकृष्ट दर्जाचे आहे. कामाचा दर्जा असाच कायम राहिला तर रत्नागिरीतील तिवरे धरणाप्रमाणे येथेही दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या धरणप्रकल्पाची संपूर्ण चौकशी करण्याची मागणी राज्यपालांसह, मुख्यमंत्री आणि जलसंपदा मंत्र्यांकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले.