सिंधुदुर्ग - रत्नागिरी या दोन जिल्ह्यात कोरोना रोखण्यासाठी सरकार अपयशी ठरले आहे. कोकणातील लोकांच्या जीवावर शिवसेना मोठी झाली. त्या चाकरमानी आणि गाववल्यांमध्ये शिवसेनेने वाद लावले असल्याचा आरोप विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला. तसेच भाजपतर्फे सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांच्याकडेच स्वॅब मशीनसाठी एक कोटींचा आमदार निधीची पत्रे दिल्याचे जाहीर केले.
कणकवली नगरपंचायत सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत दरेकर बोलत होते. सोबत आमदार निरंजन डावखरे, जिल्हाध्यक्ष राजन तेली, प्रमोद जठार, जिल्हा परिषद अध्यक्ष समिधा नाईक, बँक संचालक अतुल काळसेकर, भाजप महिला जिल्हाध्यक्ष संध्या तेरसे, आदी उपस्थित होते.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोरोना साथीचा आढावा घेतला आहे. हे सरकार कोरोना हाताळायला अपयशी ठरले. जनतेचा संताप होत आहे. कोकणात कोरोना नव्हता. गावकरी आणि चाकरमानी वाद निर्माण करण्याचा प्रयत्न शिवसेनेने केला. क्वारंटाईन करण्यासाठी जागा कमी पडते म्हणून जाऊ नका असे मुख्यमंत्री सांगतात हे दुदैव असल्याचे दरेकर यांनी सांगितले.
भाजपचे कोकणातील आमदार अडीच कोटी कोरोना रोखण्यासाठी देत आहेत, असेही दरेकर म्हणाले. राणेंच्या हॉस्पिटलमध्ये कोविड १९ तपासणी देण्यास पालकमंत्री टाळाटाळ करत आहेत. केवळ पालकमंत्री राजकारण करून जनतेची दिशाभूल करत आहेत. एक कोटी 30 लाख आम्ही निधी देत आहोत. ती पत्रे भाजपच्या कोकणातील आमदारांनी दिली आहेत. स्वॅब सेंटर आठवड्यात उभे राहिल्याशिवाय प्रमोद जठार परत जाणार नाहीत. कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्हातील आमचा कोकण दौरा कामी आला असल्याचा दावा विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी केला.
चाकरमान्याची व्यवस्थेत सरकार कमी पडले. कोकणातील जनतेवर या सरकारने अन्याय केला. राणे यांच्याबद्दल पालकमंत्री बोलले, राणेंना डावलून दरेकर यांचा दौरा आहे. मुळात आम्ही राणेंच्याच हॉटेलमध्ये उतरलो. राणेंचे ऑपरेशन असल्याने नितेश राणे आले नाहीत. आमच्यात वाद करून शिवसेनेच्या हाती काही लागणार नाही. क्वारंटाईन आम्हाला करायला पाहिजे. मग रत्नागिरी येथे १०० पेक्षा जास्त रुग्ण असताना रोज पालकमंत्री ये-जा करतात. हे कशाचे उदाहरण आहे? सिंधुदुर्ग जिल्ह्यात आमची ताकद आहे. आम्ही काळजी घेऊ,रत्नागिरी जिल्हाची काळजी तुम्ही करा. असाही टोला दरेकर यांनी लगावला. अपयश झाकण्यासाठी पालकमंत्री बेताल वक्तव्य करत असल्याचेही दरेकर म्हणाले.